उदगीर : कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर यांच्या वतीने व नॉलेज ब्रिज,शेवगाव तसेच एज्युटेक कार्पोरेशन, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने “ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट अँड युज ऑफ ए.आय. फॉर इफेक्टिव टीचिंग अँड लर्निंग” *(E-Content Development and Use of AI for Effective Teaching and Learning)* या विषयावर दोन दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक 27 व 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाविद्यालयाच्या चैतन्य सभागृहात संपन्न होणार आहे.
सध्याच्या डिजिटल युगात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता अध्यापन व अध्ययन अधिक परिणामकारक कसे करता येईल, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन मिळावे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. अभ्यासक्रमानुसार दर्जेदार ई-कन्टेन्ट निर्मिती, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, ए.आय. आधारित अध्यापन पद्धती, मूल्यांकनातील नवनवीन तंत्रे तसेच विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती यांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून श्री. एकनाथ कोरे आणि श्री. भूषण कुलकर्णी हे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. दोन्ही मान्यवरांना शैक्षणिक तंत्रज्ञान, डिजिटल कन्टेन्ट डेव्हलपमेंट आणि ए.आय. आधारित अध्यापन क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून सहभागी प्राध्यापक, शिक्षक,संशोधक व विद्यार्थ्यांना आधुनिक अध्यापन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती व प्रात्यक्षिकांचा लाभ मिळणार आहे.कार्यशाळेत विविध सत्रांद्वारे ई-कन्टेन्ट तयार करण्याची प्रक्रिया, ओपन एज्युकेशनल रिसोर्सेसचा वापर, ए.आय. टूल्सचा अभ्यास, प्रात्यक्षिके व चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. सहभागींसाठी प्रश्नोत्तर सत्र,कार्यशाळा किट,प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर व आयोजन समितीच्या सदस्यांनी सर्व प्राध्यापक,शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी होऊन आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ही कार्यशाळा शिक्षकांसाठी ज्ञानवर्धक व कौशल्यविकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
