Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोणाच्या येण्याने आणि जाण्याने काँग्रेसवर परिणाम होणार नाही - माजी नगराध्यक्ष बलिगा बी



उदगीर ( एल.पी.उगीले) लातूर लोकसभा मतदारसंघात जनमानसामध्ये जागृती झाली आहे. पूर्वी कधीकाळी नेते मंडळी जे सांगतील, ते ऐकून मतदान व्हायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने खोटी आश्वासने आणि भुलथापा या भांडवलावर विजय मिळवला. सतत लोकांना फसवून विजय मिळवता येत नाही. हे आता सिद्ध झाले आहे. गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाने एकही आश्वासन पाळलेले नाही. उलट जनतेची परिस्थिती आणखीच खराब करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे.

 गेल्या वेळेस  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट होती. शिवाय वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांची युती होती, त्याचेही परिणाम काँग्रेस मत विभागणीवर झाले. मात्र आता एमआयएमची कोणासोबत युती नाही, किंवा लातूर लोकसभा मतदारसंघात कोणाला पाठिंबाही दिलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजातील मताचे विभाजन हे शक्य नाही. मुस्लिम मतांचे सौदागर होण्याची कोणी स्वप्न पाहत असेल तर मुस्लिम मतदार आता त्याला भीक घालणार नाही. असे परखड विचार उदगीर नगरपालिकेच्या माजी अध्यक्ष सय्यद बलिगा बी यांनी व्यक्त केले आहे.

व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी अनेक जण भारतीय जनता पक्षात जात आहे. आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि स्वार्थ साध्य करून घेण्यासाठी कित्येक जण सत्तेत सहभागी होत आहेत. कित्येकांना भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार धुवून काढून स्वच्छ बनवण्याची यंत्रणाच आहे की काय? असे आता सर्वसामान्य माणसाला वाटू लागले आहे.

 ज्या व्यक्तीवर दोन दिवसापूर्वीच हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी केले होते, त्याच व्यक्तीला आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री करणे कितपत योग्य आहे? अशा खोटारड्या पंतप्रधानावर आता जनता विश्वास ठेवणार नाही. गेल्या दहा वर्षात दिलेली एकही आश्वासन पाळलेले नाही. केवळ धार्मिक आणि जातीयवाद निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे एवढेच भाजपने काम केले आहे. समाजात तेढ निर्माण  करणाऱ्यांना काय म्हणून मतदान करायचे? लातूर लोकसभा मतदारसंघाचे गेल्या वेळेस चे भाजपचे प्रतिनिधी तथा विजयी झालेले उमेदवार शृंगारे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात एकही विकासाचा प्रकल्प आणला नाही. किंवा कोणताही विकास केलेला नाही तेव्हा त्यांना काय म्हणून मतदान करावे? असा प्रति प्रश्नही बलिगाबी यांनी उपस्थित केला आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघांतर्गत यावेळी समाजवादी विचारधारेला मानणारा वर्ग मोठ्या संख्येने असल्याने निश्चितपणे काँग्रेस महाविकास आघाडीच्या पारड्यात लक्षणीय मतदान होईल. भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव करण्याची ताकद उदगीरच्या पावन भूमीत आहे. संत आणि महंतांच्या पावनभूमीतून काँग्रेसच्या उमेदवाराला आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कोण कोणत्या पक्षात गेले, याच्याशी काहीही लोकांना देणे-घेणे नाही. आता ही निवडणूक सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी होता येईल. असा विश्वासही बलिगाबी यांनी बोलून दाखवला आहे.

लोकसभेची निवडणूक ही फार मोठी निवडणूक आहे. उमेदवाराला सर्वत्र फिरायला वेळ मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपापल्या भागात कार्यरत आहेत, आणि त्यांनी न घाबरता कोणत्याही दबावाखाली न येता, बिनधास्तपणे काम करावे. मोठ्या प्रमाणात मतदान करून घ्यावे. असेही आवाहन याप्रसंगी बलिगाबी यांनी केले आहे.

अर्चनाताई पाटील किंवा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस पक्षावर तीळ मात्र परिणाम होणार नाही. ज्यांना एखादा दवाखाना नीट चालवता आला नाही किंवा ज्यांची कारकीर्द सतत वादग्रस्त राहिली आहे. अशांच्या येण्या जाण्याने काय फरक पडणार? असा प्रति प्रश्नही  माजी नगराध्यक्ष बलिगा बी यांनी उपस्थित केला आहे.

उदगीर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये अल्पसंख्यांक, ओबीसी, मराठा समाज आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन महाविकास आघाडीचे काम युद्ध पातळीवर करू लागले आहेत, हीच गोष्ट काँग्रेस पक्षाच्या विजयाची नांदी  ठरेल. असाही विश्वास बलिगाबी यांनी बोलून दाखवला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.