उदगीर(एल पी उगिले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 'खरी कमाई'आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते.
या आनंद नगरीसाठी उद्घाटक म्हणून शालेय समिती सदस्य डॉ.प्रकाश येथे तर,प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,संमेलन प्रमुख सुधाकर पोलावार व संमेलन सहप्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते.शालेय समिती सदस्य डॉ.प्रकाश येरमे यांनी फित कापून आनंद नगरीचे उद्घाटन केले.सर्व मान्यवर पाहुण्यांचे पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रमुख उद्घाटक डॉ.प्रकाश येरमे यांनी शाळेने आयोजन केलेल्या बाल आनंद नगरी उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान वाढेल.त्यांच्यामध्ये सर्जनशीलता,कल्पकता आणि आत्मविश्वास वाढेल.खरेदी-विक्रीचा अनुभव येईल.खऱ्या कमाईचे महत्व विद्यार्थ्यांना समजेल.या उपक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकांचे, पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.अशाच नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळा खऱ्या अर्थाने ज्ञानाचे आणि आनंदाचे केंद्र बनते.आनंद नगरीत स्टॉल लावलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
बाल आनंद नगरीत विविध पदार्थांचे एकूण ६२ स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते.इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंद नगरीचा आनंद लुटला.
