उदगीर (एल पी उगिले)
दृष्टिहीनांच्या शिक्षण, पुनर्वसन व अंधत्व निवारणासाठी उल्लेखनीय कार्य करणारे उदगीर येथील ज्येष्ठ डॉक्टर, समाजसेवक तथा उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीरचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांची प्रतिष्ठेच्या ‘लुई ब्रेल पुरस्कार २०२६’ साठी वैयक्तिक श्रेणीत निवड करण्यात आली आहे. परतूर येथील लुई ब्रेल शिक्षण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता परतूर येथील इंदिरा मंगल कार्यालय (लालबहादूर शास्त्री कॉलेज रोड) येथे होणार असून, याच कार्यक्रमात संस्थात्मक श्रेणीत पुणे येथील ‘माई बालभवन’ या संस्थेलाही गौरविण्यात येणार आहे.
उदगीर येथील ‘अरुणा अभय ओस्वाल रिसोर्स सेंटर फॉर द ब्लाइंड’ व्ही आय
च्या माध्यमातून डॉ. लखोटिया यांनी ग्रामीण व शहरी भागातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचा नवा प्रकाश निर्माण केला आहे. सन २०१५ पासून सुरू असलेल्या या केंद्रात ब्रेल लिपी, संगणक प्रशिक्षण, संगीत शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन पूर्णतः मोफत दिले जाते. अनेक दृष्टिहीन विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी झाले आहेत.यासोबतच, उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीरचे अध्यक्ष म्हणून डॉ.रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली अंधत्वमुक्त मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. मोफत नेत्रतपासणी शिबिरे, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरजू रुग्णांसाठी उपचार व जनजागृती उपक्रमांमुळे लाखो रुग्णांना दृष्टी लाभली असून, सामाजिक आरोग्य क्षेत्रात हे रुग्णालय आदर्श ठरत आहे.
डॉ. रामप्रसाद लखोटीया यांच्या या निवडीबद्दल उदगीर व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे उदगीर शहराच्या सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात अभिमान व्यक्त करत आहेत.
