Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अभियंता रमेश मोरे यांचे उदगीरच्या विकासात मोठे योगदान : मान्यवरांच्या प्रतिक्रिया

 



उदगीर  (एल पी उगिले): उदगीर नगर परिषदेमध्ये नगर अभियंता म्हणून 1990 पासून 2016 पर्यंत सलग 25 वर्षे काम केलेल्या अभियंता रमेश मोरे यांचे उदगीरच्या विकासात हातभार लावणाऱ्या अनेक प्रकल्पामध्ये मोलाचे योगदान लाभले आहे. आगामी काळातही उदगीरच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरेल, अशा प्रतिक्रिया अभियंता रमेश मोरे यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

उदगीर नगर परिषदेत अनेक वर्षे अभियंता म्हणून काम केलेले अभियंता रमेश मोरे यांच्या एकसष्टी निमित्त ललित भवन मंगल कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, मलकापूरचे सरपंच गुरुनाथ बिरादार, सुधीर भोसले, भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पुदाले, विजय निटुरे, माजी नगरसेवक रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, आनंद बुंदे, रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, बिदर जिल्हा मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष दयानंद बिरादार, उदगीर रोटरी क्लबचे सचिव विक्रम हलकीकर, मलकापूर ग्रा. पं. चे सदस्य महेश तोडकर यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी अभियंता रमेश मोरे यांच्या सेवेतील सुरुवातीपासूनच्या काळापासून आजपर्यंतच्या कामाला उजाळा देत असताना उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून राबविलेल्या अनेक प्रकल्पामध्ये मोरे यांचा मोलाचा वाटा राहिल्याचे सांगत, एक मित्र म्हणून त्यांच्या यशाचा आपल्याला नेहमीच अभिमान राहिला असल्याचे सांगितले. 

दिलीप पाटील नागराळकर यांनी यावेळी बोलताना अभियंता रमेश मोरे यांच्याशी असलेल्या जुन्या परिवारिक नात्यांचा संदर्भ देत रमेश मोरे यांनी त्यांच्या कार्यातून स्वतःला सिद्ध केले असल्याचे सांगत आगामी काळातही मोरे यांनी सामाजिक कार्यात आपले सदैव योगदान द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना अभियंता रमेश मोरे यांनी उदगीर, निलंगा व बारामती येथे काम करीत असताना आलेले अनुभव सांगत उदगीरकरांनी दिलेले प्रेम कधीही विसरता येणार नाही असे सांगितले. उदगीर नगर परिषदेत काम करीत असताना अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर विश्वास टाकत जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून या प्रयत्नाला सर्वांच्या सहकार्यामुळे यश मिळाले असल्याची भावनाही यावेळी अभियंता मोरे यांनी व्यक्त केली.

यावेळी मोरे परिवाराच्या वतीने ओंकार मोरे, उमाकांत मोरे, महेश मोरे, बब्रुवान मोरे, प्रभाकर मोरे, सचिन जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

यावेळी मोतीलाल डोईजोडे, ऍड दत्ताजी पाटील, विजय निटुरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मल्लेश झुंगा स्वामी यांनी केले. कार्यक्रम अभियंता मोरे यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.