उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर–देगलुर रोडलगत असलेल्या सर्वे नं. 244 मधील जमिनीवरून आज दुपारी गंभीर तणाव निर्माण झाला. आपल्या हिस्स्याच्या जमिनीची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या 50–60 नागरिकांवर दोन व्यक्तींनी येत अश्लील शिवीगाळ, जातीवाचक अपशब्द तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटना 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी अंदाजे 1 वाजता घडली.
अर्जदार मंडळी खुटातील भागातील साफसफाई करत असताना संजय हीरालाल पवार आणि सुभाष पवार (रा. बोरताळा तांडा) हे अचानक जागेवर आले व “जमीन आमची आहे” असा दावा करीत वाद घालू लागले.
संजय पवार यांनी उपस्थित महिलांकडे पाहून अश्लील भाषेत “तुम्हाला घोडे लावतो” अशी घृणास्पद शिवी दिली.
त्यांनीच “महारानो तुम्ही मोजलेत का” असा जातीवाचक अपशब्दही उच्चारला.
तर सुभाष पवार यांनी “तुमचे बघून घेतो” असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.
शिवीगाळ करत निघून गेले, असे साक्षीदारांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी संयुक्त निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पोलीस ठाण्यात सादर केले.
घटनेनंतर पानफुला बलांडे, सारजाबाई बलांडे, संगिता बोडके, चंद्रकांत बलांडे, राजकुमार गंडारे, उत्तम पकोळे, बाबासाहेब सुर्यवंशी, गौतम कांबळे, महेंद्र सुर्यवंशी आणि सुरेश बोडके यानी संयुक्त निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
हे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला अधिकृतरीत्या सादर करण्यात आले असून आरोपींवर तत्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महार वतनी जमीन असल्याचा दावा
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमीन ही “महार वतनी जमीन” असून तिच्यावर भोगवटा वर्ग–२ नियम लागू होतात.
अशा जमिनीवरील मुख्य कायदेशीर अटी
या जमिनीचे हस्तांतरण किंवा विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही.
परवानगी घेताना नियमानुसार नजराणा / शुल्क भरावे लागते.
अटींचे पालन न करता विक्री किंवा दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्यास तो अवैध ठरतो.
जमिनीचा वापर बदलायचा असल्यास (कृषीवरून नॉन-अग्रीकल्चर) अतिरिक्त नियम लागू होतात.
जमिनीचा अचूक वर्ग, नोंदवहीतील बदल आणि परवानग्या तपासणे आता प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
जमिनीवरील हक्क-विवादातून सुरू झालेला तणाव आता जातीवाचक शिवीगाळ, महिलांवर अश्लील अपशब्द आणि जिवे मारण्याच्या धमक्या इथपर्यंत पोहोचला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून निवेदन पोलीस ठाण्यात पोहोचले असून उदगीर ग्रामीण पोलीस तपास सुरू आहे.
आरोपींवर कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद होतो आणि वतनी जमीन वर्गवारीबाबत प्रशासन काय निष्कर्ष देते — याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
