उदगीर (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक स्वप्नील अण्णा जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नुकताच छत्रपती संभाजी नगर येथे जाहीर प्रवेश केल्यानंतर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी स्वप्निल अण्णा जाधव यांच्यातील संघटन कुशल नेतृत्व पाहून त्यांच्यावर उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवत, त्यांना विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
स्वप्निल अण्णा जाधव यांना या निवडीचे पत्र उदगीर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकाच्या बैठकीत देण्यात आले. एका कर्तबगार तरुणाला योग्य संधी मिळाल्याबद्दल महाविकास आघाडीमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या नियुक्ती पत्राच्या वेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, तालुकाप्रमुख प्रशांत मोरे, शहर प्रमुख बालाजी सोनाळे, तालुका समन्वयक व्यंकट साबणे, युवासेना तालुकाप्रमुख चंद्रकांत सांगळे, बालाजी काळे, तालुका सचिव अरुण बिरादार, वाहतूक सेना तालुकाप्रमुख शरद सावरे, उप तालुकाप्रमुख महेश फुले, शिवकांत चटनाळे, माजी शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, संजय मठपती, गोविंद बेंबडे, अशोक भुरे, अमोल गिलचे, तैमूर शेख, बंटी घोरपडे, महादेव शेलाळे, दत्ता पलंगे, सत्यवान गिलचे यांच्यासह नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.
*स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसैनिकांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे - बालाजी रेड्डी *
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकप्रियता कमावली आहे. त्या बळावर शिवसैनिकांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. या दृष्टीने आपण सर्वांनी जिवाचे रान करू या, या निवडणुका शिवसैनिकांच्या असल्याने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इतर वेळा नेत्यांच्या निवडणुकांसाठी शिवसैनिक नेहमीच जीवाचे रान करतात. मात्र आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी जीवाचे रान करून एकजुटीने शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी शिवसेनेचा विचार घेऊन जनतेच्या दरबारात गेले पाहिजे. आपली माणसे विजयी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे विचार शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी व्यक्त केले.
उदगीर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी याप्रसंगी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती. आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्याने आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा आपण प्रयत्न करू, मात्र पक्षाचा आदेश आणि आघाडीचा धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे. पक्षशिस्त सर्वांनी पाळली पाहिजे, असा आदेशही याप्रसंगी बालाजी रेड्डी यांनी बोलून दाखवला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही भूमिका महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांना आवडली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण कौतुकाचे असल्याचे विचार अनेकांनी व्यक्त केले आहेत.
*संधीचे सोने करीन - स्वप्निल जाधव*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तरुणांचे मार्गदर्शक तथा जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी आणि उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास टाकत, उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिमा उंचावण्यासाठी तथा पक्ष संघटन बांधणीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. असे आश्वासन याप्रसंगी स्वप्नील अण्णा जाधव यांनी दिले. तसेच शिवसेनेने आपल्याला फार मोठी संधी दिली आहे. त्या संधीचे आपण सोने करून दाखवू. असा विश्वासही व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने राहून महाविकास आघाडीचा धर्म पाळून निवडणुका जिंकण्यासाठी लढायचे आहे. अशी जिद्द उराशी बाळगून निवडणुकीमध्ये उतरावे. असेही आवाहन याप्रसंगी स्वप्नील अण्णा जाधव यांनी केले आहे. याप्रसंगी उदगीर शहर आणि ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
