देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायती टीबीमुक्त घोषित; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव
तालुक्यातील२७ग्रामपंचायतींनी "टीबीमुक्त ग्रामपंचायत "चा मान मिळवला असून, जिल्हाधिकारी मा. वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले. ही गौरवप्राप्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आरोग्य विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून शक्य झाली.
देवणी तालुक्यातील एकूण ४५ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींना "सिल्वर मेडल" प्राप्त झाले असून यात अंबानगर, बोंबळी (खु.), धनेगाव, सावरगाव, वडमूरंबी या पाच गावांचा समावेश आहे. तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींना "ब्राँझ मेडल" प्राप्त झाले असून यात भोपणी, देवणी (खु.), कोनाळी, बोरोळ, वलांडी, अचवला, आजणी, आनंदवाडी, बटणपूर, दरेवाडी, डोंगरवाडी, गौडगाव (विजयनगर), हंचनाळ, इंद्राळ, कमालवाडी, लासोना, माणकी, नागातिर्थवाडी, नेकनाळ, संगम, सय्यदपूर, तळेगाव (भो). आदी गावांचा समावेश आहे.
यामुळे तालुक्यातील सुमारे ६०% ग्रामपंचायतींनी टीबीमुक्ततेकडे वाटचाल केली आहे. पुरस्कार वितरण समारंभात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ. आरती घोरुडे, डॉ. ऋतुजा माने, क्षयरोग विभागाचे श्री. करपे व यासीन शेख यांच्यासह आरोग्य कर्मचारी, सरपंच व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही यशस्वी कामगिरी म्हणजे आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वित प्रयत्नांचे फलित आहे. टीबी मुक्तीसाठी जनजागृती, लवकर निदान, प्रभावी उपचार व नियमित फॉलोअप यावर विशेष भर देण्यात आला होता.
"या उपक्रमांच्या यशामुळे उर्वरित ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळाली आहे. येत्या काळात १००% टीबीमुक्त देवणी तालुका घडवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे."
डॉ. रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी
