लातूर /रोखठोक: ॲड. एल पी उगीले
लातूर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून मंगेश चव्हाण रुजू झाल्यानंतर गुन्हे आणि गुन्हेगारी जगताचा मागोवा घेत, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि झालेल्या गुन्ह्याचा शोध, अशा भूमिकेतून पोलीस प्रशासनाने काम करावे. यासाठी पोलिसांनी जनतेला विश्वासात घेऊन जनतेचे सहकार्य घेतल्यास गुन्हे रोखण्यात आणि गुन्हाचा शोध लावण्यात पोलिसांना सहज यश मिळू शकते. असा विश्वास त्यांनी पोलीस प्रशासनातील कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर सर्वच अधिकारी कामाला लागले. विशेषत: औसा आणि भादा परिसरातील पोलिसांनी जनतेच्या मदतीने काम करण्याचा ठाम निर्धार करून जनसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा वाढवली. परिणामतः जनतेतूनही पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. अशा भावना निर्माण झाल्या. त्यातूनच पुढे गुन्हे होण्यापूर्वीच गुन्ह्यांचा सुगावा घ्यायला सुरुवात झाली. आणि मग यातूनच गुन्ह्याच्या तयारीत असलेली फार मोठी सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या हाती लागली.
काही गुन्हेगारांच्या टोळ्या ह्या पोलिसांची नाडी ओळखून, पर जिल्ह्यात जाऊन गुन्हे करायचे आणि त्या गुन्ह्यातील माल तिसऱ्याच जिल्ह्यात जाऊन विक्री करायचा, आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लपून राहायचे. अशा प्रवृत्तीचे असतात. तशाच पैकी बीड जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांची टोळी लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आल्याची गुप्त बातमी पोलिसांच्या तपास पथकाला लागली. दरम्यान या भागातील जनतेनेही पोलिसांना सहकार्य करायचे ठरवलेले असल्यामुळे, या टोळीवर नजर ठेवणे पोलिसांना शक्य झाले. आणि मग पोलिसांच्या विशेष पथकांनी तसेच लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत, मोठ्या सीताफिने शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला ताब्यात घेतले. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन तिघे फरार होण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांचे इतर साथीदार पोलिसांच्या हाती लागले. या अट्टल गुन्हेगाराकडून अनेक गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काही चोरीच्या संदर्भामध्ये त्यांनी तोंड उघडायला सुरुवात केली आहे.
लातूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन औसा, किल्लारी, भादा, रेनापुर, चाकूर, अहमदपूर आणि उदगीर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून घरफोड्या आणि दुकानाचे शटर तोडून चोऱ्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून सदर घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच या घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्या साठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी आणि गुन्हे अन्वेषण शाखा तसेच पोलीस स्टेशन औसा, किल्लारी, भादा, रेनापुर, चाकूर, अहमदपूर येथील प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रात्रीच्या वेळी सतर्क राहून पेट्रोलिंग करणे व नाकाबंदीचे आयोजन करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. रात्रीची गस्त घालत असताना स्थानिक नागरिकांना सामावून घेण्याबाबत ही मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या सूचनाचे तंतोतंत पालन करत दिनांक दोन ते तीन ऑगस्ट 2025 च्या दरम्यान पहाटे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या औसा व भादा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व पोलिस अंमलदारांना नागरिकाकडून परिसरातील माहिती मिळाली की, शिवली मोड व सिंघाळा येथे एक चार चाकी मालवाहू वाहन संशयित रित्या औसा ते तुळजापूर रोडवर फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने औसा पोलीस स्टेशन व भादा पोलीस स्टेशनच्या रात्री गस्तीवरील पोलीस अधिकारी व पोलिस आमदार यांनी सदरचे संशयित वाहन नागरिकांच्या सहकार्याने शिवली मोड परिसरातून ताब्यात घेतले. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन या वाहनातील तीन इसम पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले. उर्वरित पाच इसमास ताब्यात घेऊन त्यांना चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे रिहान मुस्तफा शेख (वय 20 वर्ष रा. गौतम नगर, परळी तालुका परळी जिल्हा बीड), अन्वर खान जलालखा पठाण )वय 24 वर्ष रा. गौतम नगर परळी तालुका परळी जिल्हा बीड) हफीज मुमताजुद्दीन शेख (वय 36 वर्ष रा. आझाद नगर, परळी तालुका परळी जिल्हा बीड), सादिक मोहम्मद यासीन मोहम्मद (वय 44 वर्ष रा. जुना बाजार बीड) फारुख नबी शेख (वय 27 वर्ष रा. बार्शी नाका बीड) असे सांगितले.
त्यांच्या ताब्यातील चार चाकी मालवाहू अशोक लीलँड टेम्पो (क्रमांक एम एच 44 यु 32 98) ची झडती घेतली असता, त्यामध्ये दरोड्यासाठी लागणारे साहित्य, ज्यामध्ये एक लोखंडी कोयता, एक धारदार चाकू, दोन लोखंडी दांडके, दोन लोखंडी पार, दोन लोखंडी कटावणी, एक स्टिल रोड, एक लोखंडी कोयता, एक चौकोनी स्टीलचा पाईप, दोन लोखंडी पाईप, वाहनासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बनावट रेडियमच्या नंबर प्लेट, एक लोखंडी पट्टी, दोन स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी साखळी, एक ग्राइंडर मशीन, जुने वापरात असलेले चार मोबाईल असा एकूण सात लाख 71 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यामध्ये व राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे भादा पोलीस स्टेशन येथे गुरन 155/ 25 कलम 310 (4), 310(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव पोलीस ठाणे भादा हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रजीतवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक भादा महावीर जाधव, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर, पोलीस अंमलदार रामकिशन गुट्टे, हनुमंत पडिले, जमादार मौला बेग, दत्तात्रय तुमकुडे, योगेश भंडे, सचिन गुंड, भागवत गोमारे, सूर्यकांत मगर, प्रकाश राठोड, संदीप राठोड इत्यादींनी केला आहे.
याच गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील दोन स्वतंत्र पथक करत आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे नमूद दरोडेखोर घातक शास्त्रासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
चौकट......
उदगीरच्या चोरीची कबुली, मात्र तक्रारीत तो मालच नाही?
उदगीर येथील एका दुकानाचे शटर तोडून आतील मुद्देमाल आपण चोरला असल्याची कबुली या दरोडेखोरांनी दिली असली तरी, चोरलेला माल हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचे दरोडेखोरांचे म्हणणे आहे. मात्र जी चोरी झाली त्या दुकानदाराने आपला चोरीस गेलेला माल सांगत असताना कुठेही गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा उल्लेख केला नसल्याचे समजते.
