उदगीर (प्रतिनिधी) सध्या उदगीर विधानसभेतील उदगीर व जळकोट तालुक्यात बांधकाम कामगाराच्या बोगस नोंदण्या करून देऊन शासकीय योजनेचे लाभ मिळवून देणारे रॅकेट सक्रिय असून त्या संदर्भात बोगस ग्रामपंचायत व बोगस ग्रामविकास अधिकारी तयार करून बोगस कागदपत्राच्या आधारे कामगार नोंदणी करणाऱ्या अज्ञात एजंट व ई सेवा केंद्र संचालका विरुद्ध पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
हा गुन्हा दाखल झाला असून सुद्धा हे रॅकेट बोगस कामगार नोंदणीचे रॅकेटचे स्वरूप खूप मोठे असून या गुन्ह्याचे स्वरूप त्याची व्याप्ती फार मोठी आहे. उदगीर विधानसभेतून जवळपास 5000 बांधकाम कामगाराच्या नोंदण्या करण्यात आल्या असून आमच्या निदर्शनानुसार यातील 70 टक्के नोंदण्या या बोगस आहेत. खरे लाभार्थी हे या योजनेपासून वंचित असून, बोगस लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या बोगस नोंदणी चे खरे स्वरूप पाहिल्यास बांधकाम कामगारांना शासनामार्फत अनेक योजना चा लाभ दिला जातो. त्यात घर उपयोगी भांडी, सुरक्षा किट दिले जातेच, त्यासोबतच कामगारांच्या दोन मुलांना पहिली ते वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षणा सारख्या उच्च शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती उच्च शिक्षणासाठी एक लाखापर्यंत आहे. या शिष्यवृत्ती मिळवण्याच्या उद्देशाने उदगीर विधानसभा परिसरातील क्लास 1, क्लास 2,क्लास 3 प्रवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बोगस कामगार नोंदणी करणाऱ्या एजंटच्या मार्फत 2000 ते 5000 रुपये देऊन आपल्या पत्नी ची बांधकाम कामगाराची बोगस कागदपत्राच्या आधारे बोगस नोंदण्या करून घेऊन अशा शासकीय योजनांचा लाभ उचललेला आहे.
अशा सधन शासकीय, निमशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शासनाची फसवणूक होणे ही बाब अत्यंत गंभीर असून अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासन होणे गरजेचे आहे. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून अशा बोगस कामगारची नोंदणी करुन घेणारे व करुन देणारे एजंट, ई सेवा संचालक व संबंधित लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत .
सदरील प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडून झाल्यास त्या विरोधात मनसे तीव्र आक्रमक आंदोलन हाती घेईल, याची नोंद घ्यावी. असे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त लातूर यांना देवुन मागणी केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, लातूर शहराध्यक्ष मनोज अभंगे, शहर सचिव सरफराज सय्यद, शहर सचिव गणपती राठोड आदी उपस्थित होते.
