नांदेड (प्रतिनिधी) : समाजातील वंचित आणि उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांना सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान मिळावा, यासाठी नांदेडमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या पुढाकाराने नांदेड शहरालगत म्हळजा येथील तब्बल साडेतीन एकर जागेवर भारतातील पहिले ‘किन्नर भवन’ उभारले जाणार आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने खा. डॉ. गोपछडे यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. या वेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, तहसीलदार संजय वारकड, कमल फाउंडेशनचे सचिव अमरदीप गोधणे, तसेच तृतीयपंथीय समुदायातील रणजीता बकस गुरु, फरिदा बकस, अर्चना बकस, जया बकस, बिजली बकस आदी मान्यवर उपस्थित होते.
तृतीयपंथीयांचे सामाजिक जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते. त्यांना समाजात प्रतिष्ठेची व सुरक्षिततेची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारकडून तृतीयपंथीयांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या किन्नर भवनात त्यांच्या निवासाची, उपजीविकेची व स्मशानभूमीसह अन्य मूलभूत गरजांची पूर्तता होणार आहे.
डॉ. गोपछडे यांनी या उपक्रमास लोकाभिमुख आणि मानवतेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न केला असून, नांदेड साठी ही एक आदर्श आणि ऐतिहासिक संकल्पना ठरणार आहे. समाजातील सर्व घटकांना सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, आणि हे भवन त्याच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरणार आहे.
