उदगीर (एल .पी .उगीले)
परसात फुलांच्या तर ओसरीत माणसांच्या बागा फुलवणारी, नात्याच्या मखमली वस्त्रातील जरीचा धागा बनणारी माय. उरा सोबत घराच्याही धापा ऐकणारी माय, लौकिक अर्थाने शिकलेली नसली तरी जगण्याचं तत्त्वज्ञानरुपी मोल शिकवणारी अम्मा म्हणजेच तुमची आमची माय होय. असे मत एक कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात अंतर्गत गेल्या चौदा वर्षीपासून अखंडितपणे चालू असलेल्या वाचक संवाद चे 341 वे पुष्प सुशांतजी शिंदे, उपजिल्हाधिकारी, उदगीर यांनी इंद्रजीत भालेराव लिखित तुमची आमची माय या साहित्यकृतीवर अत्यंत प्रभावी संवाद साधून गुंफले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लळा-जिव्हाळा आत असावा, नको उमाळा वरकरणी,
कधी न धरावा गर्व मनाचा, लिन राहावे प्रभु चरणी |
या काव्यपंक्तीप्रमाणे एका वारकरी संप्रदायाच्या समृद्ध घरातून महानुभाव पंथीय झोपडीत येऊन सहा एकर शेतीची 106 एकर जमीन करत केवळ कुटुंबाला समृद्ध केले नाही, तर महानुभाव पंथाचा स्वीकार करून समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या अम्मा अर्थात इंद्रजीत भालेराव यांच्या आईच्या जीवनाला उजागर करणारी तुमची आमची माय हि साहित्यकृती असून याची मांडणी तीन भागात केलेली आहे. भाग एक स्वतः इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेले लेख तर दुसऱ्या भागात नात्यातील इतरांनी मांडलेले त्यांचे अनुभव व मत आणि भाग तीन मध्ये नात्याबाहेरील मान्यवरांनी व्यक्त केलेले अनुभव रुपी कथन आहे. ही साहित्यकृती प्रत्येकांना आपापल्या आईची मायेची उब देणारी असून अत्यंत प्रेरणादायी आहे. यावेळी अनेकांनी सुंदर चर्चा घडवून आणली. यानंतर उपस्थितितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेवटी अध्यक्षीय समारोप करताना डॉ. उटगे म्हणाले की, कुटुंबातली डोळसदृष्टी असणारी आई संसाराला कुणाची दृष्टी लागू न देता समृद्धीकडे घेऊन जाते. तसेच समाजाला समृद्ध करणारी वाचक संवाद ही एक चळवळ आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
शासकिय दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या मातृगौरवी वाचक संवादचे सूत्रसंचालन प्रसिद्ध नाट्यलेखक तुळशीदास बिरादार यांनी केले, तर संवादकांचा परिचय मुरलीधर जाधव यांनी करून दिला. आभार हणमंत म्हेत्रे यांनी मानले.व या कार्यक्रमात प्रकाश बिरादार व कचरूलाल मुंदडा या दोघांचे कविता सादरीकरणही झाले.
