उदगीर (एल .पी. उगीले)स्वच्छ भारत अभियान (नागरी) २ अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील महिला बचत गटांसाठी "घनकचरा व्यवस्थापन उपजीविकेच्या संधी, क्षमता, बांधणी प्रशिक्षण" उदगीर नगरपरिषद कार्यालयात यशस्वीरित्या संपन्न झाले.या प्रशिक्षण कार्यक्रमास मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रशिक्षणाचे आयोजन कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.स्वच्छ भारत अभियान (ना.) २ ही योजना १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू असून, तिचा मुख्य उद्देश शहरे ‘कचरामुक्त’ करणे हा आहे. यामध्ये ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ म्हणजेच पुनर्वापरावर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि कचऱ्याचे व्यवस्थापन हे उत्पन्नाचे साधन बनविणे, यावर भर दिला जात आहे.या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना खालील गोष्टींवर प्रशिक्षण देण्यात आले. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत देणे, सुका कचरा प्रक्रिया केंद्र आणि RRR (Reduce-Reuse-Recycle) केंद्र चालवणे, फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर, कापडी पिशव्यांचा उपयोग आदी विषयावर प्रशिक्षणास उपस्थित महिला गटांना कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनचे अधिकारी ऋषिकेश सिद्धेवाड व बालाजी कदम यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महिला सदस्यांना प्रमाणपत्र व कापडी पिशव्यांचे वितरण मुख्याधिकारी सोमनाथजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर अभियान व्यवस्थापक विशाल गुडसुरकर, महारुद्र गालट, समुदाय संसाधन व्यक्ती सौ. अनिता चौधरी आणि सौ. सुवर्णा धुळेकर यांनी मोलाचे योगदान दिले.
