उदगीर (प्रतिनिधी) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य विशेष शिक्षकांनी करावे. असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ.अनिल भिकाने यांनी केले. ते उदगीर येथील संत तुकाराम विधी महाविद्यालय येथे आयोजित राज्य पातळीचे तीन दिवसीय सी आर ई कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम विधी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार नावंदर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. अनिल भिकाने,पंचायत समिती उदगीरचे विस्तार अधिकारी एस एम थोटे, प्रा सुरेश मुदुडगे, प्रा. नाजिम पटेल, प्रा. जगन मुदडगे, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील, विवेक जैन आदींची उपस्थिती होती. यावेळी तीन दिवसीय कार्यक्रमात प्रा.जगन मुदडगे, मुंबई येथील इशिता सपकाळ, ज्योती खरात, जीवन विकास मतिमंद कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापकीय अधीक्षक राजा पटेल अब्दुल मलिक, प्रा. सतीश कल्पे ,यांनी विविध विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रमुख अतिथींचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ.भिकाने म्हणाले की, दिव्यांग क्षेत्रात काम करण्याचे जे पवित्र काम करता ते उल्लेखनीय आहे. त्यामुळे तुम्ही दिव्यांगा बाबतीत समाजात जाऊन जनजागृती करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. दिव्यांगाच्या चार प्रकाराच्या व्यतिरिक्त नवीन 21 प्रकारचे दिव्यांगाचा समावेश झाला असून तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे.त्यामुळे तुम्हाला सर्व दिव्यांगाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नागेंद्र साबणे यांनी केले तर आभार प्रा सतीश कल्पे यांनी मानले. यावेळी सर्व विशेष शिक्षक व पुनर्वसन व्यावसायिक तज्ञ यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
