लातूर (ॲड. एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याच्या विरोधात धडाकेबाज मोहीम सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांची कारकीर्द लातूरकरांना चांगलीच माहिती आहे. त्याच तोडीचे काम रेनापुर हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे देखील करत आहेत. अशा कर्तबगार अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गांजाची लागवड करून झटपट श्रीमंत होण्याचा मोह न आवरल्याने, आरोपीने आपल्या ताब्यातील गायरान जमिनीवर चक्क गांजाचीच लागवड करून त्याची जोपासना केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याच्या विरोधामध्ये मोहीम सुरू केली आहे. अवैध धंद्याची माहिती मिळावी म्हणून ठीक ठिकाणी गुप्त बातमीदारही नेमलेले आहेत. अशाच एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने, तातडीने रेणापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याशी संपर्क साधून वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली निवाडा गावाच्या गायरान जागेमधून जवळपास एक लाख 94 हजार चारशे रुपयांचा 9.07 किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत.
खुल्या जागेवर गांजाची लागवड होत असल्याची ती बातमी समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रेणापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाई मध्ये ही झाडे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी रेणापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस स्टेशन येथे गुरन 269/ 25 कलम 20 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये आरोपी विजयकुमार राघू गायकवाड (वय 45 वर्ष राहणार निवाडा तालुका रेनापुर जिल्हा लातूर) यास ताब्यात घेतले आहे.
आरोपीने निवाडा गायरान मधील शेत गट क्रमांक दोन मौजे निवाडा शेत शिवार या ठिकाणी गांजाची वाढलेली दहा झाडे लागवड केली होती. ती ताब्यात घेऊन त्या दहा हिरव्या झाडांना पांढऱ्या कापडी पिशवीत टाकून त्याचे वजन केल्यास ते 9.720 की. ग्राम इतके भरले. गांजाची प्रति किलोग्रॅम किंमत वीस हजार रुपये अंदाजे प्रमाणे एकूण एक लाख 94 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेणापूर येथील सपोनी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांची निर्मिती, विक्री आणि वापर यावर प्रतिबंध असल्याने, सदरील प्रकरणी मोठी शिक्षा सुनावली जाऊ शकते. विशेषतः अत्यंत कर्तबगार आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे अधिकारी आपल्या परिसरात आलेल्या असताना आरोपींनी केलेली हिम्मत त्याला फार मोठी किंमत भोगायला लावणारी आहे.
या मोठ्या कारवाईमुळे निश्चितच लातूर जिल्ह्यातील गांजाची तस्करी करणाऱ्या अवैध धंदेवाल्यांना ही मोठी चपराग ठरणार आहे. अवैध धंद्याच्या विरोधामध्ये आपण सतत कारवाई चालू ठेवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी निश्चितच अवैध धंदेवाल्यांना आळा घालेल, अशी आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, रेनापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वातील पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. या कामगिरी मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, सपोनी आदिनाथ पाटील, नंदलाल चौधरी यांच्यासह पोलिस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, गणेश साठे, सतीश सारोळे, विश्वनाथ गिरी, शिवकुमार कच्छवे, नामदेव सारोळे, दत्तात्रय गिरी, चंद्रकांत केंद्रे ,अरुण कुमार बनसोडे यांच्या पथकाने ही यशस्वी धाड टाकली आहे.
या कारवाईबद्दल निवाडा परिसरातील लोक पोलिसांचे अभिनंदन करत आहेत.
