देवणी लक्ष्मण रणदिवे
रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयाचे असलेले छत्रपती शिवाजी महाविद्यालय नाव बदलण्यासाठी श्रीमंत व्यक्तीकडून लाखो रुपये देणगी देण्याची मागणी झाली .मात्र कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले प्रसंग पडल्यास मी माझ्या बापाचे नाव बदलेन मात्र कॉलेजला दिलेले शिवाजी राजांचे नाव बदलणार नाही .यावरून शिवरायाचे कर्तृत्व सिद्ध होते. राजांची उंचीच इतकी अफाट होती की सिंहासनासाठी राजे नव्हते तर राजासाठी सिंहासन होते. शौर्य, वीरता, सहास, लोककल्याण, नितीमानता, विधायक दृष्टी , प्रजाहितता व मानवी मूल्याचे जतन अशा महान विचाराचे रसायन म्हणजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय असे राजे भारतीयांसाठी दीपस्तंभ आहेत असे गौरवोद्गार डॉ शिवाजीराव देवनाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात बोरोळ ता देवणी येथे काढले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर राजकुमार कोयले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष शिवमती अनिताताई जाधव ,तालुकाध्यक्ष श्रीमती अनिता जगताप , शिवमती पुष्पाताई जाधव, शिवमती वंदनाताई भोसले उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉ देवनाळे म्हणाले वैज्ञानिक युगात आम्हाला काळाच्या प्रवाहानुसार जगाव लागेल कारण स्वराज्याची जागा आज लोकशाहीने घेतली तलवारीची जागा लेखणीने तर ढालीची जागा ग्रंथांनी घेतली आहे. यापुढे जगावर राज्य करायचे झाल्यास विद्वता नावाच्या शस्त्राचा वापर करावा लागेल मग देश कोणताही असो . शिवाजी राजांचे कृतत्व इतके अफाट आहे की आबाल बालकापासून ते थोरा मोठ्यापर्यंत राजे सर्वांना आदर्श वाटतात . देशात कित्येक सत्ता आल्या नि गेल्या मात्र भारत देशाच्या भूमीत शिवाजी महाराज छत्रपती म्हणून अमर आहेत पुढे राहतील. नितीमूल्य आणि आदर्श संस्काराचा डोलारा ढासळत असल्याची ओरड हा मानवी समाजात चिंतेचा विषय बनला आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे शाळा महाविद्यालयातून शिवचरित्राच्या संस्काराची अभ्यासक्रमातून पेरणी करणे गरजेचे आहे अशेही ते म्हणाले. यावेळी या कार्यक्रमात कुमारी दिशा सूर्यवंशी हिने पोवाडा तर अनुष्का वानखेडे यांनी शिवरायांवर आपले विचार मांडले. सदरील कार्यक्रमास भरत कोयले, राजेंद्र मुळखेडे, शिवमती सुमित्रा कोयले , उपसरपंच प्रमोद पाटील, पत्रकार प्रताप कोयले , हंसराज देवणे, संजय कोयले, दत्ता हुरुसनाळे सत्यदेव गरड ,व्यंकट कोंगे, शांताबाई सूर्यवंशी, श्रीमती केवळ ताई , शेंडगे ताई यासह गावातील ज्येष्ठ नागरिक,महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
