देवणी लक्ष्मण रणदिवे
वलांडी: देवणी तालुक्यातील वलांडी गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता श्रीनिवास वांगवाड यांना निवेदन देऊन रमजान महिन्यात वीज भारनियमन करू नये, अशी मागणी करण्यात आली.
गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने उपवास (रोजा) धरतात. सकाळी पहाटे ५ वाजता सहेरी आणि सायंकाळी इफ्तार (सूर्यास्तानंतर उपवास सोडणे) यासाठी वीज अत्यंत महत्त्वाची आहे. मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी तसेच महिलांना रोजा सोडण्यासाठी आणि पकडण्यासाठी मस्जिदच्या माईकवर सूचना देण्यासाठीही अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे.सध्या उन्हाळ्याचा तिव्रता वाढत असून तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत ते ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारनियमन झाल्यास नागरिकांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रमजान महिन्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा आणि भारनियमन टाळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर हमीद तांबोळी, मुस्तसिन मूंजेवार, जाहीद शहा, मूशरफ मूंजेवार, कलीम शेख,हसन मोमीन, निहाज मूर्शेद, अक्रम शेख, अहमद पठाण यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
