"शिक्षण हेच शक्तीचे साधन आहे, आणि या विद्यार्थिनींचा प्रवास हे याचे उत्तम उदाहरण आहे."
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी, : ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, देवणी तालुक्यातील मुलींसाठी संजीवनी ठरलेल्या स्वयम स्किल उपक्रमाचा समारोप सोहळा वलांडी येथे उत्साहात पार पडला. जगमंगल सोशल फाउंडेशन आणि ग्रामीण महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्विस-एड इंडिया तसेच युरोपियन युनियन यांच्या विशेष सहकार्यातून राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमाने मुलींना जीवन कौशल्ये, संभाषण कौशल्ये, डिजिटल साक्षरता आणि स्पोकन इंग्लिश यांचे धडे दिले.या उपक्रमाचा उद्देश "लैंगिक अत्याचार व भेदभावाचा सामना करणे, विशेषतः घरगुती हिंसा आणि बालविवाह" या समस्यांवर लक्ष केंद्रित करून महिलांना सक्षम बनवणे हा होता. स्वयंतेज अकादमी-लातूर द्वारे राबवलेला हा कोर्स मुलींना संवाद कौशल्य, इंग्रजी बोलणे, एम.एस. ऑफिस, इंटरनेट प्रावीण्य, जीवन कौशल्ये यामध्ये प्रावीण्य मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आला होता.
विद्यार्थिनींनी या कोर्समध्ये नियमित उपस्थिती, सक्रिय सहभाग, आणि अभ्यासातील उत्कटता यांचे उदाहरण घालून दिले. विद्यार्थिनींनी आत्मसात केलेले इंग्रजी कौशल्य उपस्थितांसमोर सादर केले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. १२ दिवस आणि १८ तासांच्या प्रशिक्षणात स्वयंतेज अकादमीच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना घडवले. याबद्दल सर्व मान्यवर आणि विद्यार्थिनींच्या पालकांनी प्रशिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थिनींच्या समर्पण आणि चिकाटीमुळे त्या भविष्यात नक्कीच सक्षम आणि आत्मनिर्भर बनतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
______________
विद्यार्थिनींच्या खास भावना:
स्नेहा पाटील हिने सांगितले, "माझ्या आयुष्यात कधीच असा कोर्स करेन असे वाटले नव्हते. आज मी इंग्रजी बोलू शकते यावर माझा विश्वास बसत नाही. आधी मी संगणक फक्त झेरॉक्स दुकानात पाहिला होता, पण या कोर्समुळे मी स्वतः लॅपटॉप हाताळला आणि वापरला. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. यासाठी मी जगमंगल सोशल फाउंडेशन, ग्रामीण महिला विकास संस्था, स्विस-एड इंडिया, युरोपियन युनियन आणि स्वयंतेज अकादमी यांचे मनापासून आभार मानते."संस्कृती बिरादार हिने इंग्रजीमध्ये आपल्या कुटुंबाबद्दल आणि मित्रांबद्दल सादरीकरण केले. तिने कोर्समधून काय शिकलं हे सर्व उपस्थितांसमोर सांगितलं आणि तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले.मोनिका बिरादार हिने सांगितले, "मी कधी १५ ते २० किलोमीटर प्रवास करून शिकेन असे वाटले नव्हते. सुरुवातीला माझ्या कुटुंबाने या प्रशिक्षणासाठी विरोध केला होता, पण ग्रामीण महिला विकास संस्था यांच्या मदतीने माझे कुटुंब तयार झाले. आज मी स्वतःला इंग्रजीत सादर करत आहे, याचा मला खूप आनंद आहे. यासाठी मी स्वयंतेज अकादमीच्या प्रशिक्षकांचे आभार मानते."
______________
मान्यवरांचे विचार:
माणिक डोके पोलीस निरीक्षक, देवणी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले, "महिलांनी केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर समाजातील अन्याय आणि भेदभावाविरोधात उभं राहावं."
राणी भंडारे यांनी आपल्या भाषणात सांगितले, "मुलींनी शांत न राहता पुढे आले पाहिजे आणि विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. हा उपक्रम ग्रामीण भागातील मुलींना सक्षम करण्यासाठी मोलाची भूमिका बजावतो."
कुशावर्ता बेळे यांनी सांगितले, "आम्ही बालविवाह, लैंगिक अत्याचार, भेदभाव आणि घरगुती हिंसेविरोधात कार्य करत आलो आहोत. पण जेव्हा आम्ही आकाश सर आणि तेजस सर यांना भेटलो आणि अच्छुत बोरगावकर यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे, आम्ही आणि जगमंगल सोशल फाउंडेशन ने पुढाकार घेऊन हा कोर्स सुरू केला. या कोर्ससाठी आसपासच्या १० गावांमधील ६० मुलींनी सहभाग घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य पाहून आम्हाला खूप समाधान वाटत आहे."
तेजस गुजराथी यांनी या कोर्सच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितले आणि विद्यार्थिनींना आपली मनोगते व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले.
______________
समारोप सोहळ्यातील मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राणी भंडारे सरपंच, वलांडी होत्या. उद्घाटन माणिक डोके पोलीस निरीक्षक, देवणी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून तेजस गुजराथी संस्थापक संचालक, जगमंगल सोशल फाउंडेशन उपस्थित होते. याशिवाय कुशावर्ता बेळे संचालक, ग्रामीण महिला विकास संस्था, कचराताई गायकवाड संचालक, ग्रामीण महिला विकास संस्था, गिरीश सबनीस प्रकल्प समन्वयक, आकाश सोनकांबळे संचालक, स्वयंतेज अकादमी लातूर,बाबासाहेब उमाटे पत्रकार, दैनिक सकाळ लक्ष्मण रणदिवे, कृष्णा इंगोले, विजयश्री बोचरे, सरोजा शिंदे,आणि प्रशिक्षक अर्पिता बिराजदार, रेणुका होनकर, सुर्योदय बोईनवाड हे मान्यवर देखील उपस्थित होते.
______________
प्रशिक्षणाने ग्रामीण मुलींना दिली नवी उंची:
स्वयम स्किल उपक्रमाद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींनी आपल्या अनुभवांची शेअरिंग करताना या उपक्रमाने त्यांचे आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि डिजिटल ज्ञान कसे विकसित केले यावर प्रकाश टाकला. या प्रशिक्षणामुळे शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा मार्ग उघडला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
______________
ग्रामीण भागात कौशल्य विकासाचा नवा अध्याय:
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण भागातील मुलींनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग स्वयंपूर्णतेसाठी करावा, असे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांना भविष्यातही पाठिंबा देण्याचा शब्द दिला.
______________
यशस्वी पहिल्या बॅचनंतर नवीन संधींचा मार्ग मोकळा!
स्वयम स्किल उपक्रमाच्या पहिल्या बॅचच्या यशस्वी समारोपानंतर आयोजकांनी नवीन बॅच सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे अधिकाधिक ग्रामीण मुलींना या उपक्रमाचा लाभ घेता येईल आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल.
