Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेजज्ञान फाउंडेशनच्या ध्यान महोत्सवाची उत्साहात सांगता




उदगीर(एल.पी.उगीले) : ‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त  उदगीर येथे लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात १ डिसेंबर रोजी ‘रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा’ (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया व साहित्यिका अश्विनी निवर्गी यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात तेजज्ञान फाउंडेशनच्या बबिता साळुंखे  यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केला. त्यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व पटवून देत, “हातातील मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, ‘स्व-अनुभव’ होईल, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. “मी कोण आहे?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यातून उपस्थितांना ‘स्व-अनुभव’ मिळाला.

या कार्यक्रमात ८५ पेक्षा जास्त साधक आणि नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी मनोभावे कार्यक्रमाचा आनंद घेतला. याप्रसंगी उद्घाटक डॉ. रामप्रसाद लखोटिया व अश्विनी निवर्गी यांनी, आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याचा मनावर मोठा ताण आहे, प्रत्येक माणूस हा उद्यासाठी जगत आहे, त्यामुळे त्याच्या हातून आज निसटून जात आहे, अंतर्मन शुद्धीकरणासाठी ध्यान साधना महत्वाची असल्याचे सांगितले.

तेजज्ञान फाउंडेशनतर्फे ज्ञानेश्वर मलवाड यांनी उपस्थितांना साधनेसाठी प्रेरणा दिली.

कार्यक्रमाच्या समारोपात जवळपास सर्व उपस्थितांनी २१ दिवसांचे ध्यान चॅलेंज घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.