Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महात्मा बसवेश्वरांचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजच्या समाजाला दिशादर्शक : प्रतिक्षा लोहकरे

उदगीर (एल.पी.उगीले) बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य आज एकविसाव्या शतकातही  समाजासाठी दिशादर्शक आहे.असे प्रतिपादन मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष योजना लातूरच्या समन्वयक कु. प्रतिक्षा लोहकरे यांनी केले.

उदगीर वीरशैव समाजाच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८५ वा स्मृतिदिनानिमित्त आयोजित ९० वा वचन सप्ताहात पहिले पुष्प गुंफण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. अभिषेक शिंदे होते. यावेळी विचारपीठावर वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे उपस्थित होते. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

 पुढे बोलताना कु. प्रतिक्षा लोहकरे यांनी सांगितले की, महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये जातीव्यवस्था नष्ट करण्याचे कठीण कार्य केले. विचार स्वातंत्र्य व आपले मत व्यक्त करण्यासाठी विविध जातीतील शरण-शरणींना एकत्र जमवून अनुभव मंडपाची स्थापना केली. अनुभव मंडपाचे स्वरूप म्हणजेच आजचे संसद होय. सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या जात आहेत, मात्र या योजनेच्या लाभापासून अज्ञानाअभावी अनेक महिला वंचित आहेत. यासाठी अशा योजनांची जनजागृती समाजाच्या विविध उपक्रमांतून होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय समारोपात पो. नि. शिंदे यांनी, उदगीर वीरशैव समाजाच्या वतीने  राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन अँड. महेश मळगे यांनी केले. आभार उत्तरा कलबुर्गे यांनी मानले. कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.