Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ई पिक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांनाही सोयाबीन व कापूस पिकाचे सानुग्रह अनुदान द्या - सौ.उषा कांबळे




उदगीर (एल पी.उगीले)

उदगीर विधानसभा मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंद केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना देखील सोयाबीन आणि कापूस पिकाचे सानुग्रह अनुदान द्यावे. अशी आग्रही मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला करण्यात आली आहे. 

जळकोट तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष सौ. उषा कांबळे, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, बाजार समितीचे संचालक राजेश मोतेवाड, संग्राम नामवाड, शिवराम कपाळे, महेश सूर्यवंशी, हावगी गुरुनाथ स्वामी, संतोष डुमणे, सुधाकर सोनकांबळे, रियाज सय्यद, प्रमोद दाडगे, गौतम वाघमारे, संदीप चव्हाण, अजय सोनुले, राम नामवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, सचिन सिद्धेश्वरे, गोपाळकृष्ण गबाळे, बालाजी धुळशेट्टे, नूर खाजा खा पठाण, व्यंकटराव खटके, राजू पाटील, राजेंद्र वाघमारे, मारुती भोपळे, तुकाराम पवार, संभाजी मोरे, सतीश बडगिरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सौ. उषा कांबळे यांनी सांगितले की, हे शासन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याकडे लक्ष देत नाही. केवळ मतदानावर लक्ष ठेवून नवीन नवीन योजनांची घोषणा करणे, असे काम चालू ठेवले आहे. त्यामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर आणि जळकोट या दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना ना धड पिक विमा मिळाला, ना शेतकरी सहानुग्रह अनुदान मिळाले. सोयाबीनला तर हमीभावापेक्षा कमी भावामध्ये विक्री करण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. ही अत्यंत शोकांतिका आहे. उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये दुर्दैवाने सतत शेतकऱ्यांची अग्नी परीक्षा निसर्ग घेतो आहे. कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ! अशी परिस्थिती आहे, आणि असे असताना देखील शासनाने ज्या गांभीर्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करायला पाहिजे, ते सोडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अटी आणि नियम यामध्ये गुंतवून ठेवण्याचे काम केले जाते आहे. सर्वच शेतकरी काही उच्चशिक्षित नाहीत. अनेकांना ऑनलाइन पद्धतीने कामे करणे कठीण जात आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन कृषी विभागामार्फत कामे केली जावीत आणि शेतकऱ्यांना तात्काळ गतवर्षी पिकांचे नुकसान झाले त्याची भरपाई द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा शेतकऱ्यांना द्यावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला रस्त्यावर उतरावे लागणे हे सरकारला अशोभनीय आहे. मात्र जर सरकार आपल्याकडे लक्ष देत नसेल तर सरकारला वटणीवर आणण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही याप्रसंगी सौ. उषा कांबळे यांनी सांगितले. आपण सदैव शेतकऱ्यांच्या सोबत असून आंदोलनात्मक पवित्रा घेतला तर सर्वात पुढे आपण राहू. असे आश्वासनही शेतकऱ्यांना दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.