उदगीर (एल.पी.उगीले) : तीन राज्याच्या सीमेवर असणा-या उदगीर या ऐतिहासिक शहरात आता आणखी एका कार्यालयाची भर पडली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या उदगीर येथील लोकसंख्येचा विचार करून स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष बाब म्हणून मंजुरी आणली असुन आज पासुन वाहनाचे सर्व कामे उदगीर येथेच होतील. आजपासुन उदगीरची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण झाली आहे. एम.एच. ५५ या क्रमांकाने हे ओळखले जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे आपल्या कामातून उदगीरची वेगळी ओळख निर्माण करेल असे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते.
या वेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, बसवराज पाटील कौळखेडकर, रामराव बिरादार, भरत चामले, शिवानंद हैबतपुरे, समीर शेख, सर्जेराव भांगे, देविदास कांबळे, बालाजी भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगरसेवक विजय निटुरे,अनिल मुदाळे, उप प्रादेशिक अधिकारी विनोद चव्हाण, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, आर.टी.ओ विभागाचे अधिकारी सुनिल खंडागळे , सुनिल शिंदे, अशोक जाधव, माळी, विजय पाटील, उत्तरा कलबुर्गे, बाळासाहेब मरलापल्ले, अॅड. दिपाली औटे, मधुमती कनशेट्टे, अॅड.वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, शिवकर्णा अंधारे,आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
९ ऑगस्ट या दिवसाला ऐतिहासिक महत्व असून आजच्या दिवशी उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होत आहे. उदगीरच्या विकासातील हा महत्वाचा टप्पा आहे. अनेक दिवसांपासून हे कार्यालय उदगीर येथे सुरु करण्याबाबत मागणी होती. विविध मोटार चालक आणि मॅकेनिकल संघटना यांनीही मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात उदगीर येथे विशेष बाब म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. उदगीर येथे सुरु झालेल्या या कार्यालयामुळे उदगीर तालुक्यासह या कार्यालयाला जोडलेल्या सर्व तालुक्यातील नागरिकांना वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी, त्याचे नूतनीकरण, वाहन तपासणी आदी सर्व सुविधा मिळणार आहेत. तसेच वाहनधारकांना आवश्यक कागदपत्रे काढण्याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे फीत कापून आणि कोनशीला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच विविध मोटारवाहन चालक, मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
