Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुधाकर शृंगारे यांचे कार्यकर्ते सक्रिय होताच, राजकीय वर्तुळात चलबिचल



उदगीर (प्रतिनिधी)

लातूर जिल्ह्याचे माजी खासदार सुधाकरराव शृंगारे हे उदगीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा वाढली आहे. सुधाकरराव शृंगारे यांनी खासदारकीच्या काळात तब्बल साडेआठ हजार कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणून मतदार संघाचा विकास केला. मात्र दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठरवून त्यांच्याबद्दल अपप्रचार करून त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले. असा आरोप करत सुधाकरराव शृंगारे यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांनी सुधाकरराव शृंगारे यांनी केलेल्या विकास कामाची माहिती जनतेला व्हावी, म्हणून प्रसिद्धी माध्यमांशी सुसंवाद साधला आहे. यामध्ये जलजीवन योजना असेल किंवा रस्त्याचे मोठे जाळे निर्माण करणे असेल, तसेच रेल्वेसाठी दिलेला निधी असेल, दिव्यांगांना साहित्य वाटपासाठी चा निधी असेल या सर्व बाबींची सविस्तर माहिती या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

 सुधाकरराव शृंगारे हे भारतीय जनता पक्षाचे असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांचा ठिकठिकाणी मोठमोठा सत्कार केला. विशेष म्हणजे उदगीर मध्ये प्रवेश करताना पहिला सत्कार मलकापूर हद्दीत शासकीय विश्रामगृहाच्या समोर सुधाकरराव शृंगारे यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच उदगीर शहरातून बाहेर पडल्यानंतर हळी हंडरगुळी आणि अहमदपूरच्या जवळही क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार आणि फुलांची उधळण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांचे स्वागत आणि सत्कार केला. तसेच या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त सुधाकरराव शृंगारे यांच्या कार्यकर्त्यांचे लागले होते. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर उदगीर विधानसभा मतदारसंघातून सुधाकरराव शृंगारे यांची उमेदवारी निश्चित आहे की काय? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. आणि या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातील इच्छुकांची चलबिचल वाढली आहे. सुधाकरराव शृंगारे नेमके कोणत्या पक्षाकडून उमेदवार राहतील? याची उत्सुकता जशी मतदारांना आहे, तशीच उत्सुकता इतर राजकीय पक्षाच्या लोकांना देखील आहे. ते नेमके कोणता झेंडा खांद्यावर घेऊन मैदानात उतरतील? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागून राहिले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय क्षेत्रामध्ये जणू भूकंप आल्याचे वातावरण सध्या तरी पाहायला मिळत आहे. यदा कदाचित ते अपक्ष उभा राहिले तर उदगीर विधानसभा मतदारसंघाचे गणित बदलू शकतात. असेही राजकीय जाणकार बोलू लागले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.