उदगीर (एल पी उगिले)
माजी आ. सुधाकर भालेराव यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर हळूहळू भारतीय जनता पक्ष खिळखिळा होत चालला आहे. पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्या मधून बिघाड्या होऊ लागल्या आहेत. प्रथमत: महिला आघाडी मधून अनेक नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात गेल्या, त्या पाठोपाठ भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उदगीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, खा. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या सोबत आपले सर्व सरदारही घेतल्याने आता उदगीर तालुका भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा आघाडीमध्ये मोठे खिंडार पडल्याचे चर्चिले जात आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये खिंडार पडत चालले आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बळ मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चितच चुरस वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उदगीर येथे आल्यानंतर सभेमध्ये सर्वच मान्यवरांनी भालेराव केंद्रबिंदू समजून केलेली भाषणे ही गोष्ट अप्रत्यक्षपणे सुधाकरराव भालेराव यांची उमेदवारी जाहीर करणारीच होती. असे म्हटले तर वावगे होणार नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला लागलेली गळती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला आलेली ओहोटी पाहिल्यास राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या बदलाची चर्चा सुरू आहे.
