उदगीर (एल. पी. उगिले)
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेला कायम ठेवत, योग्य आणि गद्दारी न करणाऱ्या उमेदवाराला विजयी करावे. या निवडणुकांमध्ये पैसा आणि सत्तेची मस्ती दाखवली जाऊ शकेल. तर ती सत्तेची मस्ती मोडीत काढण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
त्या उदगीर येथील शिवस्वराज्य यात्रेच्या प्रसंगी आयोजित सभेत बोलत होत्या. या शिवस्वराज्य यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बसवराज पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, माजी आ. सुधाकरराव भालेराव, माजी आ. शिवराज तोंडचिरकर, माजी आ. धर्मा सोनकवडे, प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ.शिवाजी मुळे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, गजानन सताळकर, युवा नेते बाळासाहेब पाटोदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यात शिव स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उदगीर शहरात ही यात्रा आल्यानंतर सर्वप्रथम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा पुढे डॉ. जाकीर हुसेन चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेचे तेथे सभेत रूपांतर झाले. या सभेला उद्देशून खा. सुप्रिया सुळे बोलत होत्या.
पुढे बोलताना खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या राज्यात आणि केंद्रात भ्रष्ट सरकार कार्यरत आहे. दोन दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो, असे मोठ्या अभिमानाने देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. याचे कसले कौतुक? एखाद्या विद्यार्थ्याने मी कॉपी करून उत्तीर्ण झालो असे सांगावे आणि आईने कौतुकाने थाप मारावी तसा हा प्रकार आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. लोकमताचा कदर करणे हे महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र पक्ष फोडून सत्ता बळकावणे हे महाराष्ट्राला अपेक्षित नाही. सध्याचे सरकार सर्वसामान्य माणसाच्या हिताचे काहीही करत नाही. कर्मचाऱ्यांना दाब देणे, चालू असलेल्या योजना दुर्लक्ष करून मतदारांना आकर्षित करणाऱ्या नवीन नवीन योजना जाहीर करण्यावर जोर देत आहे. महाराष्ट्रामध्ये महिलावर अत्याचार वाढले आहेत. बेकारी, बेरोजगारी मुळे युवक वर्ग उदासीन होऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधान बदलण्याची भाषा करत होते. त्यांना मतदारांनी धडा शिकवला आहे, आणि हा धडा शिकवल्याबरोबर त्यांना लाडकी बहीण आठवली. भाजपच्या आमदाराने पोलिसांना धमकी दिली, आणि या राज्याचे गृहमंत्री गप्प आहेत, यावरूनच एकूण राज्यांमध्ये सरकारचे कामकाज कसे चालले आहे? हे जनतेच्या लक्षात आले आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये साम - दाम - दंड - भेद या सर्व नितीचा वापर होईल. मात्र जनतेने ठाम निश्चय करावा आणि आपला उमेदवार निवडून देताना आपल्या मताचा आदर करणारा निवडून द्यावा, आपल्या मताचा सौदा करून मतदारांना पक्ष संघटनेला दगा देणारा, विचारांना फाटा देणारा उमेदवार निवडून देऊ नका. असेही आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना खा. अमोल कोल्हे यांनी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. आणि स्वाभिमानी महाराष्ट्राला गद्दारी कधीच सहन होत नाही. पैशाने मतदान विकत घेण्याची भाषा केली जाईल, जनतेने सावध राहिले पाहिजे. सध्या शेतकरी, शेतमजुरांचा छळ केला जातो आहे. शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव आहे. महागाई, बेरोजगारीने सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. असे असताना सर्वसामान्य माणसाचे जगणे सरकारला महत्त्वाचे वाटत नाही. घरे फोडण्याचे राजकारण भाजपने केले आहे. शेतकऱ्यांच्या वेदना यांना दिसत नाहीत. इतकेच नाही तर 74000 आशा वर्कर स्वयंसेविकेचे मानधन गेल्या चार वर्षापासून रखडलेले आहे. असे असताना केवळ मतदारांना खुश करण्यासाठी नवीन नवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. निवडणुकीच्या पुढे अशा योजना जाहीर करून मतदारांना संभ्रमित करण्याचे काम जरी केले जात असले तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी मतदार गद्दारीला काढल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या राजवटीमध्ये गद्दारांना दिली गेलेली वागणूक सांगितली, पहिल्या गद्दारीला माफी मात्र दुसऱ्या गद्दारीला कडेलोट ही शिक्षा होती. आता आपल्याकडे कडेलोट नसला तरी मतदान प्रक्रियेतून आपण लातूरचे पार्सल लातूरला पाठवू शकतो आणि ते पाठवणार असा विश्वासही व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनता सतत शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारासोबत असल्याचे सांगितले. स्व. चंद्रशेखर भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर संजय बनसोडे हेही राष्ट्रवादीचे आमदार होते. मात्र त्यानंतर त्यांनी मतदारांच्या विश्वासाला तडा देत पवार साहेबांच्या विचार धारेला तडा देत सत्तेची कास धरली. मराठी माणसाला गद्दारी कधीच सहन होत नाही. सामान्य माणसाला धोका दिला तर सामान्य माणूस वेळेवरच धडा शिकवतो. मतदार संघाचा विकास झाल्याचे सांगतात. मात्र केवळ मूठभर गुत्तेदाराचा विकास झाला आहे, सामान्य माणसांच्या जीवनात कुठलाही बदल झालेला नाही. ज्या माणसाने सामान्य कार्यकर्त्याला मंत्री केले. त्या पवार साहेबांना सोडणारा माणूस जनतेला काय न्याय देऊ शकणार आहे? सर्वसामान्य माणसाला आपल्या मताचा केलेला सौदा आवडत नाही. जनता तुमचा हिशोब बरोबर करेल, असेही सांगितले.
या निवडणुकीत सावध राहा, तुमची फसवणूक करून, पैशाने विकत घेण्याची भाषा केली जात आहे. तुम्ही स्वाभिमानी आहात, त्यामुळे सावध राहा. किती करोडची कामे झाली म्हणून सांगतानाच सामान्य माणूस आता सावधपणे टक्केवारीचा हिशोब करू लागला आहे. आणि तुम्ही सत्तेत पैसे कमवण्यासाठी गेलात की स्वतःच्या स्वार्थासाठी गेलात? या संदर्भात विचार करू लागला आहे. महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट लोकांसोबत सहानुभूती कधीच ठेवत नाही. जे नीतिमत्तेने वागतात त्या महाविकास आघाडी सोबतच सर्वसामान्य माणूस आहे. हे लोकसभेत जनतेने दाखवून दिले आहे. आता विधानसभेतही दाखवून द्या. असे आवाहन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रा. डॉ. शिवाजी मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार माजी आ. सुधाकरराव भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजीम दायमी यांनी केले.
चौकट.....
महबूब शेख ची जीभ पुन्हा घसरली....
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी उदगीरचे प्रतिनिधी तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या संदर्भात विधान करताना पुन्हा "आला पंजा गेला संज्या" अशा घोषणा देतानाच पवार साहेबांनी "साध्या एका छोट्या बौद्ध समाजातील कार्यकर्त्याला मोठे केले, आणि त्याने गद्दारी केली" अशा शब्दात बौद्ध समाजाची अवहेलना केल्याची तीव्र प्रतिक्रिया उदगीर विधानसभा मतदारसंघात पसरली असून महबूब शेख यांनी जाहीर माफी मागावी. अशी मागणी केली जात आहे. तसेच पॅंथर युवा आघाडीच्या वतीने महबूब शेख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन लवकरच मोठ्या प्रमाणात राबवले जाणार आहे, असे अरुण उजेडकर यांनी कळवले आहे.
