उदगीर (एल. पी. उगीले)
स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या केवळ आठवणीने देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते. कार्यकर्त्यांना दिलेले पाठबळ ही कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारी बाब आहे. असे विचार काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ. उषाताई कांबळे यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्व. विलासरावजी देशमुख यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंजूर खान पठाण तसेच उदगीर बाजारपेठेतील अनेक प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ. उषा कांबळे म्हणाल्या की, लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यात उदगीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. स्थानिक पातळीवरील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसकडे असल्यामुळे आणि उदगीरच्या विकासासाठी स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांनी फार मोठे योगदान दिले असल्यामुळे या भागातील लोक स्व. विलासरावजी देशमुख यांना कधीही विसरू शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपत शिवाजीराव हुडे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील साहेबांच्या आशीर्वादाने विकसित झालेले आहेत. त्यामुळे साहेबांची आठवण कायम काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहते. सध्या तोच आदर्श देशमुख परिवाराच्या वतीने उदगीरच्या विकासासाठी कायम ठेवला आहे. काँग्रेसला पाठबळ देण्याचे काम देशमुख परिवार करत आहे. त्यामुळेच उदगीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे, असे सांगितले.
