उदगीर: (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी 'रॅगिंग विरोधी कायदे व नियम' या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कदम यांनी रॅगिंगच्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकला, आणि कायद्याचे महत्त्व स्पष्ट केले. कदम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, "रॅगिंग हा गंभीर गुन्हा आहे. आणि त्यावर कठोर कारवाई केली जाते. कोणत्याही प्रकारच्या रॅगिंगला समर्थन देणे किंवा त्यात सामील होणे हे शाळा, महाविद्यालये आणि समाजासाठी अत्यंत घातक आहे. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावात येतात, त्यांचं शैक्षणिक जीवन बिघडतं, तसेच सामाजिक आयुष्यात देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो." तसेच सर्व विद्यार्थ्यांना सूचना केली जर कोणी रॅगिंगला सामोरे जात असेल किंवा रॅगिंगचे साक्षीदार असेल, तर त्यांनी त्वरित पोलीस किंवा महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधावा. "आपल्या सुरक्षेसाठी आणि आनंदी शैक्षणिक वातावरणासाठी रॅगिंगविरोधी कायदे खूप महत्त्वाचे आहेत, आणि त्याचं पालन प्रत्येक विद्यार्थ्याने करावं," असे ते म्हणाले. या अनुषंगाने अँटी रॅगिंग विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. प्रथम बक्षीस झिंके साक्षी, द्वितीय स्वामी विद्यालक्ष्मी, तृतीय कवटाळे उत्तेजनार्थ मलिदे वैष्णवी यांना देण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.मस्के यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती चे संस्कार आपल्याला एकमेकांना आदर देणारे आहेत. त्यामुळे रॅगिंग हा आपल्या संस्कृतीला न पटणारे आहे. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील,प्रा.डॉ.एस.एन.लांडगे, प्रा.डॉ.बी.एस.होकरणे उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.एम.बी.स्वामी यांनी तर आभार प्रा.डॉ.एस.एन.लांडगे यांनी मानले.
