लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी, म्हणून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करणे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अवैध रीतीने दारू वाहतूक करणे, विक्री करणे या हेतूने काम करणाऱ्या वर कडक कारवाई करत चार लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर दिनांक 16/08/2024 रोजी लातूर शहरातील हनुमान रोड ते गुड मार्केट कडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून विदेशी दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी अवैध वाहतूक करीत असलेल्या ओमनी वाहनाला दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमा विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 16/08/2024 रोजी ओमणी वाहनातून विदेशी दारूची अवैध वाहतूक करीत असलेला इसम नामे सिदाजी दिलीप पवार, (वय 36 वर्ष, राहणार चिकलठाणा, तालुका जिल्हा लातूर)यांचेवर कार्यवाही करत त्यांच्याकडून विदेशी दारू व वाहनासह एकूण 4 लाख 18 हजार 740 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पथकामधील पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके ,नितीन कठारे, राहुल कांबळे, मनोज खोसे यांनी सदरची कामगिरी केली आहे.
