उदगीर (एल. पी. उगिले)
लोकाभिमुख महाराष्ट्र सरकारने समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बार्टी ही संस्था सुरू केली आहे. त्याच धर्तीवर साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आता आर्टी ही संस्था सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या संस्थेमार्फत मातंग, गारुडी, मिनीमादिग, दखनी मांग, मांग म्हशी, मांग गारोडी, राघो मांग, मदिगा, मादगी आणि तत्सम समाजाच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी ना संजय बनसोडे यांनी दिली.
राज्यातील अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी पुण्यात मुख्यालय असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आधीपासूनच कार्यरत आहे. मात्र मातंग आणि तत्सम समाजाच्या कल्याणासाठी बार्टीच्याच धर्तीवर आर्टी ची स्थापना करण्याची मागणी अनेक संघटनांनी बऱ्याच वर्षापासून लावून धरलेली होती. त्यासाठी समाजातील आक्रमक कार्यकर्त्यांनी आंदोलने ही केली होती. यासोबतच अनुसूचित जातीची अ ब क ड अशी वर्गवारी केली जावी, या पद्धतीच्या मागणीचाही पाठपुरावा बऱ्याच दिवसापासून चालू आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या 11 जुलै रोजी झालेल्या बैठकीत आर्टी च्या स्थापनेचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचा शासनाचा निर्णय (जीआर) मंगळवारी काढण्यात आला आहे.
चिराग नगर, घाटकोपर, मुंबई येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक इमारतीत आर्टी चे कार्यालय असेल, या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि निबंधक पदास मान्यता देण्यात आली आहे.आर्टी मध्ये संशोधन प्रशिक्षण विस्तार व सेवा, लेख आणि आस्थापना हे विभाग असतील.
आर्टी या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात मध्ये असलेल्या सामाजिक समतेचा अभ्यास करून मातंग समाजासाठी त्याचा योग्य उपयोग करणे हे उद्दिष्ट असणार आहे. त्यासोबतच सामाजिक समतेच्या प्रक्रियेत मातंग समाजाला सामावून घेण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचेही उद्दिष्ट या संस्थेकडे देण्यात आले आहे. या संस्थेच्या वतीने समाज उन्नतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी याच पद्धतीने कार्यरत संस्थेचे सहकार्य घेणे, अशा संस्थांना प्रोत्साहन देणे असेही कार्य केले जाणार आहेत. लोकगीते, लोक संस्कृती, लोककला संशोधन यांचे प्रशिक्षण, प्रचार, प्रसिद्धी देणे, परंपरागत व्यवसायांना चालना देणे, शिक्षण, उच्च शिक्षण प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्टार्टअप रोजगार निर्मिती यावरही भर देण्यात येणार आहे. समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकास करण्यासाठी विविध उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जाणार आहेत. संस्थेच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चासत्र, संमेलने, परिसंवाद आदी उपक्रमही राबवले जाणार आहेत. समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने विविध जाणीवांची निर्मिती समाजामध्ये करण्याचे कामही ही संस्था प्रभावीपणे करेल अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
शासन दरबारी मराठवाड्याचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना प्राधान्य क्रमाने मातंग समाजाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही घेतलेला हा निर्णय निश्चितच समाजातील सर्व घटकांना आवडेल आणि याचा फायदा समाजातील तरुणांना होईल. अशी अपेक्षा ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. जणू महाराष्ट्र शासनाने येऊ घातलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मातंग समाजाला दिलेली ही मोठी भेटच ठरणार आहे. यामुळे या समाजातील तरुणांना उच्च शिक्षण आणि प्रगती करण्याची नवी दालने निर्माण झाली आहेत या संधीचा निश्चितपणे समाज फायदा घेईल असा विश्वासही ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
[7:05 PM, 7/17/2024] Ugile Sir:
