उदगीर (एल.पी.उगिले)
उदगीर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ज्यांचा उल्लेख आवर्जून केला जातो, ते लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांच्या सुकन्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांच्याकडे सध्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. ज्या खुर्चीवर कधी काळी लोकनेते चंद्रशेखर भोसले यांनी अधिपत्य गाजवले, त्याच खुर्चीवर बसून काम करण्याची संधी त्यांच्या सुकन्येला मिळाली आहे. याचा निश्चितच प्रीती चंद्रशेखर भोसले योग्य पद्धतीने फायदा घेऊन पक्ष संघटनेचा मान आणि सन्मान वाढवत आपल्या वडिलांनी आखून दिलेला मानदंड जपत लोककल्याणाची कामे करतील, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेते यांनी व्यक्त केली आहे.
उदगीर येथील भोसले कॉम्प्लेक्स च्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सभापती प्रीती चंद्रशेखर भोसले यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे तसेच उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मधुकरराव एकुरकेकर, काँग्रेस पक्षाचे नेते विकास देशमाने, धनाजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी कोयले, जिल्हा सरचिटणीस शंकर मुक्कावार, उदगीर शहराध्यक्ष अजीमोद्दीन दायमी, विधानसभेचे कार्याध्यक्ष धोंडीराम पाटील, जळकोट तालुकाध्यक्ष नेहमीचंद पाटील, जिल्हा संघटक सचिव आनंद पाटील, जिल्हा सचिव सतीश बिरादार, सचिव बाळासाहेब धुपे, काँग्रेस पक्षाचे नेते शिवाजीराव कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे, जिल्हा सचिव विधीज्ञ नारायण नागरगोजे, मनमत कोणमारे, राष्ट्रवादी लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष विधीज्ञ आशिष चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमेश्वर शेटे, व्यसनमुक्ती परिषदेच्या अध्यक्षा सौ. अंजली पाटील, कार्याध्यक्ष शिरीष वडजे पाटील, डॉ. राजकुमार गवळी इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
पुढे बोलताना शेट्टे म्हणाले की, लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला, आपला विकासाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला होता. एक सामान्य कार्यकर्ता शरदचंद्र पवारांच्या विचाराने प्रेरित होऊन आमदारच नाही तर त्यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या होत्या. आता त्यांच्या सुकन्या प्रीती चंद्रशेखर भोसले या महाविकास आघाडीचे नेतृत्व करत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य पदावर विराजमान झाल्या आहेत, भविष्यात त्यांच्याकडून वडिलांचा आदर्श जपत महाविकास आघाडीला ताकद मिळेल, असेच कार्य होईल. अशी ही अपेक्षा संजय शेट्टी यांनी व्यक्त केली.
