उदगीर (एल.पी. उगिले)
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. या विजयाचे विश्लेषण करायचे झाल्यास, भाजपचे गलथान नियोजन, दलाल प्रवृत्तीचे नेते आणि कार्यकर्ते, प्रचंड गटबाजी, प्रत्येक जण स्वतःला मोठा नेता समजू लागला आणि आपण कसेही निवडून आलो, अशा अविर्भावात मतदारांचा परस्पर सौदा करून फायदा लाटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपला चांगलाच फटका बसला. ही एका बाजूला गलथान नियोजनाची अवस्था तर दुसऱ्या बाजूला कधी नव्हे इतक्या एकजुटीने आणि प्रामाणिकपणे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी केलेली कौतुकास्पद कामगिरी! यामुळे काँग्रेसला प्रचंड मताधिक्य मिळवणे शक्य झाले.
उदगीर विधानसभा मतदार संघापुरते मर्यादित बोलायचे झाल्यास 2019 च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या याच उमेदवाराला 45 हजाराहून अधिक मताधिक्य होते. ते मताधिक्य वाढवणे तर दूरच, टिकवता देखील आले नाही. वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे हे असताना निश्चितपणे हे मताधिक्य लाखाकडे जाणारा, अशा वल्गना नेत्यांनी केल्या होत्या, तशी परिस्थिती ही होती. मात्र या निवडणुकांच्या धावपळीत संजय बनसोडे एकाकी पडले. त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले. त्यांची फळी ही म्हणावे त्या गतीने पळू शकले नाही, हे दुर्दैव आहे.
भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीचे एकूण नियोजनच पोरकटपणाचे आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या नेतृत्वाच्या हातात गेल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होत होती. इतकेच नव्हे तर उमेदवाराकडून भरमसाठ पैसा आणला आहे, मात्र ते आपल्याला देत नाहीत. अशीही ओरड कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. परिणामतः कार्यकर्ते नाराज झाले. मात्र या पुढारी टाईप नेत्यांना कार्यकर्त्यांचे नाराज होणे महत्त्वाचे वाटले नाही, किंवा त्यांनी कार्यकर्त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आपला उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आला, अशा ढेकीत मिरवत राहिले. अशा फाजील आत्मविश्वासा मुळे आणि मतदारांना गृहीत धरल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले. जिथे लाखावर मताधिक्य अपेक्षित होते, तिथे केवळ 4760 मताधिक्य घेऊन समाधान मानावे लागले. वास्तविक पाहता हे मताधिक्य केवळ आणि केवळ संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मिळाले असे म्हटले तर वावगे होणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांनी संजय बनसोडे यांच्या सोबत निष्ठेने राहून काम केले असते तर निश्चितपणे उदगीर विधानसभा मतदारसंघातून लक्षणीय मताधिक्य मिळाले असते. मात्र भाजपचे तीन गट तीन वाटेने जात होते. त्यात उमेदवाराची फरपट झाली तर नवल काय ?
व्यक्ती म्हणून सुधाकर शृंगारे यांच्या बद्दल सहानुभूती असली तरी स्थानिक च्या हलकट आणि गोडबोल्या पुढार्यामुळे मतदार संघात भाजप बद्दल चीड निर्माण झाली होती. भविष्यातही अशा पुढार्याबद्दल लोकांच्या मनात चिडच राहणार आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेणे गरजेचे आहे. एका बाजूला ही भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख आणि आ. धीरज विलासराव देशमुख या बंधूंनी योग्य नियोजन करून केलेली युद्धनीती आणि काँग्रेसचे उदगीर तालुका अध्यक्ष कल्याणराव पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल या सर्वांच्या सोबत राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून काँग्रेसच्या उमेदवाराकडे विजयश्री खेचून आणली, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी प्रामाणिकपणे, एकजुटीने कार्य केले. तर महायुतीत सतत गटबाजी पाहायला मिळाली. मंत्र्याच्या गाडीत बसायला गर्दी करणारे स्थानिक पुढारी यांच्या गावात काँग्रेस पक्षाला मताधिक्य मिळाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ना. संजय बनसोडे यांचे निष्ठावंत असलेल्या दोन-चार कार्यकर्त्यांना वगळल्यास इतर ठिकाणी काँग्रेसनेच बाजी मारली आहे. आपण उदगीरच्या विकासात कुठेही कमी पडलो नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनीही कुठे कमी न पडता महायुतीला मतदान मिळवून द्यावे, अशी मागणी आणि आग्रह संजय बनसोडे यांनी केला होता. मात्र दुर्दैवाने कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, हे नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आगामी काळात अशा संधी साधू कार्यकर्त्यापासून सावध राहणे संजय बनसोडे यांना गरजेचे आहे. अन्यथा येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघड जाऊ शकतात. आता काँग्रेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास इतर सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला एकोपा या गोष्टी महायुतीला प्रचंड त्रासदायक ठरू शकतात. कारण 4700 हे मताधिक्य नगण्य आहे. नगरपालिकेच्या एखाद्या प्रभागात देखील हे मताधिक्य ओलांडले जाऊ शकते. याचे गांभीर्य घेऊन नियोजन केले तर महायुतीला भविष्य आहे, नाहीतर काँग्रेसचे वर्चस्व शंभर टक्के निर्माण होऊ शकते. तोंडावर स्तुती करणारे, भाटगिरी करून स्वार्थ साधनाऱ्यांची संख्या सध्या मंत्री महोदयांच्या दरबारात वाढत चालली आहे. खोटी स्तुती करून अंधारात ठेवण्यापेक्षा झणझणीत अंजन घालणाऱ्या मित्रांची सध्या संजय बनसोडे यांना गरज आहे. कारण त्यांच्या सोबत राहून विरोधामध्ये प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सावधगिरीने पुढील निवडणुकाकडे पाहणे महायुतीला गरजेचे आहे.
काँग्रेसचे नेते आ. अमित देशमुख यांनी जर उदगीर वर लक्ष केंद्रित केले आणि या फळीला पुन्हा चैतन्य निर्माण करून दिले तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कल्याणराव पाटील, शिवाजीराव हुडे, शिवाजी मुळे, निवृत्तीराव सांगवे, चंद्रकांत टेंगेटोल यांची पकड सतत वाढत जाणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीची ताकद वाढवणारी ठरणार आहे. निवडणुकांमध्ये सतत विरोधकाला कमी न लेखता नियोजन होणे गरजेचे आहे जे भारतीय जनता पक्षाकडून झालेले नाही.
चौकट.......
नवरा मेला तरी चालेल सवत रांडव झाली पाहिजे......
वास्तविक पाहता माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे हे भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी वाढली असती, मात्र "नवरा मेला तरी चालेल, सवत रांडव झाली पाहिजे" अशा विकृत प्रवृत्तीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये भाजपला जर मताधिक्य मिळाले तर त्याचे श्रेय राजेश्वर निटुरे यांना जाऊ शकते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचे वर्चस्व वाढू शकते असा पोरकट आणि मूर्खपणाचा विचार करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी उदगीर तालुक्यातील स्वार्थी आणि लालची कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणे गरजेचे होते. कारण याच लोकांनी सुधाकरराव भालेराव आपले ऐकत नाहीत, आपल्याला दलाली आणि गुत्तेदारी करू देत नाहीत, याचा राग मनात धरून त्यांच्या उमेदवारीला विरोध करत परभणी वरून डॉ. अनिल कांबळे यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळवून दिली, त्यांच्याकडूनही मोठे गाठोडे हडप केले आणि ऐन निवडणुकीत त्यांना वाऱ्यावर सोडले परिणामतः लोकसभेला या मतदारसंघात आपल्याला खूप मोठे मताधिक्य आहे, असा भोंगळ विचार ठेवून काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवाराला तोंडावर आपटण्याची वेळ आली. लोकसभा क्षेत्र मोठे आहे, याची जबाबदारी सोपवत असताना पोक्त आणि वैचारिक प्रगल्भता असलेल्या नेतृत्वाला जबाबदारी द्यायला हवी होती. किंवा सरळ सरळ मंत्री महोदयांना ही जबाबदारी सोपवायला हवी होती. जेणेकरून विधानसभेची रंगीत तालीम समजून ते सर्व कार्यकर्त्यांना घेऊन गंभीरपणे काम करू शकले असते. तसे न झाल्याने शिवाय मंत्री म्हणून त्यांना इतरही मतदार संघात जावे लागल्याने जी पकड हवी होती, ती पकड राहिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास नसेल तर भाजपच्याच व्यक्तीकडे नेतृत्व सोपवत असताना जेष्ठाकडे ते सोपवायला हवे होते, कालच्या पोराकडे नियोजन दिल्यास ज्येष्ठ त्याच्या दारात जाऊन बसणार का? या गोष्टीचा विचार करायला हवा होता. मात्र दुर्दैवाने फाजील आत्मविश्वास आणि पैशावर निवडणुका जिंकता येतात, अशा भ्रमात राहिल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. खरे तर पैशावर निवडणुका जिंकता येतात, मात्र तो पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे. एखाद्या नेत्याच्या तिजोरीत बसून राहिला तर त्याच्याने निवडणूक जिंकणे शक्य नसते. हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. निवडणुका म्हटले की, अनेक रुसवे, फुगवे येतात. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची कला असलेल्या संघटन कुशल व्यक्तीला जबाबदारी देणे गरजेचे असते. ही निवडणूक आहे, माझ्या घरचे काय काम नाही, मी इतरांना का विचारत फिरू? अशा अहंकारी प्रवृत्तीने मिरवणाऱ्या पोरकट नेतृत्वावर जबाबदारी सोपवल्यास पदरात निराशाच येणार!
हा एक धडा समजून महायुतीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. कुणाला तरी वाईट वाटेल म्हणून गप्प राहणे आता सोडले पाहिजे. जी परिस्थिती आहे, ती स्पष्टपणे आपल्या नेत्याच्या समोर मांडल्यास नेता त्यातून काही उपाययोजना करू शकतो. जर फाजील आत्मविश्वास ठेवून नेत्याला अंधारात ठेवल्यास, अपघात ठरलेला आहे.
काँग्रेस पक्षाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला हे गरजेचे आहे. या निवडणुकांमध्ये निष्ठावंत नेत्यांचा कस लागला. त्यासोबतच खरे कामाचे कोण? हेही स्पष्ट झाले. कारण स्थानिक पातळीवर कोणीही काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे मोठा नेता नसताना, ज्या ताकतीने कॅबिनेट मंत्र्यांच्या विरुद्ध या फळीने लढा दिला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. याचा अर्थ काँग्रेसने आता फाजील आत्मविश्वास करू नये, कारण भाजपचा पराभव झाला ही सत्य स्थिती असली तरीही, त्यांना भाजपातील गटबाजी आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा नेत्यांचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत ठरला आहे. तसेच भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी महायुतीतील घटक पक्षातील इतर नेत्यांना दुय्यम समजून दिलेली वागणूक ही कारण मीमांसा आहे!
येणाऱ्या काळात महायुती देखील सावध होऊन डावपेच आखु शकते. या पराभवातून शहाणपण शिकू शकते. ना. संजय बनसोडे यांनी देखील आपल्या सोबत फिरणारे "भाराभर चिंध्या, एक नाही धड" ही भूमिका सोडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणे आणि त्यांना ओळखणे गरजेचे आहे. मुठभर राहू द्या, पण जीवाचे ठेवा. कारण या निवडणुकीने हे दाखवून दिले आहे. ज्या कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयाच्या विकास निधीचे लाभार्थी होत कोट्यावधी रुपये कमवले, त्यांच्या गावात, त्यांच्या परिसरात काँग्रेस पक्षाने लीड घेतली आहे, तर अशी कीड बाजूला काढणे गरजेचे आहे. जे म्हणतात की लोक ऐकत नाहीत, ते पुढच्या निवडणुकीच्या वेळी तरी लोकांना काय पटवून देऊ शकणार आहेत? अशा संधी साधूपासून सावध राहणे गरजेचे आहे. शेवटी हा ज्यांचा त्यांचा विषय आहे, त्यांचा त्यांचा निर्णय आहे. परंतु समीक्षा करत असताना स्पष्टपणे या गोष्टी मांडणे गरजेचे होते. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आणि विधानसभा निवडणुकांसाठी देखील सर्वत्र मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवाराची चाचणीही सुरू झाली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. आता येणाऱ्या निवडणुका सोप्या नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
