उदगीर (एल पी उगिले)
उदगीर तालुक्यातील लोहारा येथील बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची हित जोपासत आहे. ग्रामीण भागातील ही कंपनी शेतकऱ्यांचे हित जपण्यामध्ये अग्रेसर असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले. कंपनीकडून शेतकऱ्याच्या शेती विकासाच्या दृष्टीने बी बियाणांचा पुरवठा करणे, खते व औषधे कंपनी सभासदांना उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे बाजार भावापेक्षा कमी किमतीमध्ये घरपोच उपलब्धता केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री आणि कंपनीच्या सीएससी च्या माध्यमातून पिक विमा भरण्याचे काम चालू आहे. या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांकरिता विविध लाभकारी योजना राबवल्या जात असल्याबद्दल अफार्मचे विभागीय संचालक राजेंद्र इंगळे यांनी कौतुक केले.
याप्रसंगी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रमोद पाटील हेही उपस्थित होते.नाबार्ड अर्थसाय्यित व अफॉर्म संचलित बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या त्रैमासिक आढावा बैठकीच्या निमित्ताने मान्यवरांनी लोहारा येथे भेट दिली असता, कंपनीकडून होत असलेल्या विविध कामाचाही आढावा घेतला. कंपनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री योग्य पद्धतीने करत आहे. याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तथा आढावा बैठकीची औचित्य साधून गावात आलेले प्रमोद पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अफार्म चे विभागीय संचालक राजेंद्र इंगळे, सरपंच गणपती कांबळे, कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले, कंपनीचे संचालक पद्माकर मोगले, भास्कर जाधव, लहू नरहरे, आनंद कांबळे, श्रीमती सीमा साखरे, कंपनीचे कार्यकारी अधिकारी विष्णू मोमले, लेखापाल ऋषी मोमले, अफार्मचे यशवंत गायकवाड इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गावातील सेंद्रिय शेती करणारे कृषी भूषण पुरस्कृत शेतकरी शामभाऊ सोनटक्के यांचा सत्कारही प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
