उदगीर (एल.पी.उगीले) एका मद्यपी पोलीस कर्मचाऱ्याने रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान एका कारचालकाला "तू इथेच का थांबलास?" म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच वाद सोडवायला गेलेल्या कारचालकाच्या चुलत्यासही धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात हाती आलेली माहिती अशी की, दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालून उदगीर शहरातील मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका कारचालकाला मारहाण करत कारचे नुकसान केल्याची तक्रार मोहम्मद समीर कुरेशी मुसा कुरेशी (वय 33 वर्ष रा. उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी माधव नागरगोजे यांच्याविरुद्ध गु.र.न. 223/ 24 आणि 224/24 असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कलम 298, 323, 504, 506 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या मद्यपी पोलिसाने रात्री अकरा वाजता घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. सदरील पोलीस कर्मचाऱ्याचा गोंधळ चालू असल्याचे उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे कळविले असता, पोलीस प्रशासनाने तातडीने माधव नागरगोजे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला जबरदस्तीने गाडीत बसउन पोलीस स्टेशनला नेले. त्या ठिकाणी देखील शिवीगाळ केल्याची तक्रार आहे. तसेच तक्रारदार याच्यासोबत हुज्जत घालून वाहनावर दगडफेक करणे, असे प्रताप त्याने केले असल्याची वाचता शहरात चालू आहे. या प्रकारामुळे उदगीर शहर पोलिसांचे चांगलेच धिंडवडे निघाल्याची ही चर्चा चालू आहे. दिनांक 14 जून रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सह्याद्री लॉज च्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एम एच 24 ए एस 43 63 या क्रमांकाच्या कारच्या काचेवर दगड मारून कारचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी उस्मान छोटू मिया चौधरी यांनी ही तक्रार दिल्यावरून पोलीस कर्मचारी माधव नागरगोजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एकाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात दोन गुन्हे उदगीर शहर पोलिसात दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस कर्मचारी निलंबित...
मद्यपी पोलीस कर्मचारी माधव नागरगोजे यांनी दारूच्या नशेत वाहन चालकांना वेठीस धरून शिवीगाळ करणे, दगड मारणे, मी पोलीस आहे, काय करायचे करून घ्या. अशा पद्धतीचे वक्तव्य करून रस्त्यावर दादागिरी केली, या प्रकाराला वैतागून पोलीस प्रशासनाकडून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची चर्चा उदगीर शहरात चालू आहे.
