उदगीर (एल. पी. उगिले)
उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निडेबन हद्दीमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या तुलसी धाम सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 13 लाख 75 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस सांकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या निडेबन रोडवर तुलसीधाम सोसायटी मध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सोमेश्वर राचपा द्याडे व गोपाळ बाबुराव मनदुुमले यांच्या घरात कोणीही नाही. बहुधा ते परगावी गेलेले आहेत यावर पाळत ठेवून घराच्या दाराचे कुलूप कोंडी तोडून घरात प्रवेश केला, व घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने जुने वापरते किंमत अंदाजे नऊ लाख 80 हजार 600 रुपये व रोख रक्कम तीन लाख 95 हजार रुपये असा एकूण 13 लाख 75 हजार सहाशे रुपये ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत सोमेश्वर राजप्पा द्याडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची दखल घेऊन उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तातडीने घटनास्थळाची भेट देऊन पाणी केली. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर तीन अज्ञात चोरट्यांनी हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक निरीक्षणात लक्षात आले आहे. चोरट्यांनी तोंडाला कपडा बांधलेला असला तरीही चोरीचा तपास लवकरच लागेल असा विश्वास ग्रामीण पोलिसांना आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करत आहेत.
निडेबन हद्दीतील तुलसीधाम ही अत्यंत उच्चभ्रू वस्ती असल्यामुळे या वस्तीत एवढी मोठी चोरी झाल्याबद्दल शहरात आणि परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
