उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील प्रत्येक गावात शेतीला जाणारे रस्ते हेव्या दाव्यातून किंवा भावकीच्या वादातून अडवले जातात, मात्र आता शेतकऱ्याची अडचण कोणीही करणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे शेतीला जाणारे रस्ते आडवाल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. असा इशारा उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिला आहे. उदगीर तालुक्यातील कुमठा खुर्द, क्षेत्रफळ येथील शेतकऱ्यांसाठी लोकसहभागातून खुला करण्यात आलेला रस्ता, हा एका शेतकऱ्याने खोदून, काटे टाकून बंद करण्याचा प्रयत्न केला होता. रस्ता बंद केल्यानंतर कुमठा खुर्द व क्षेत्रफळ येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार उदगीर यांना अर्ज करून, रस्ता खुला करून देण्यात यावा. अशी मागणी केली होती. अर्जदार नामदेव भोजू राठोड व इतर १४ शेतकऱ्यांनी अर्ज दिला होता.
त्या अर्जानुसार तहसीलदार राम बोरगावकर यांनी संबंधित मंडळ अधिकारी तलाठी यांना पत्र देऊन सदरील रस्त्याची स्थळ पाहणी करून, शेतकऱ्यांना रस्ता खुल्ला करून द्यावा. असा आदेश देण्यात आला होता. त्या अनुषंगाने हेर विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव, पोलिस हेड कॉन्स्टेबल व्यंकट शिरसे, तलाठी सावन उळागड्डे यांच्यासह पंच त्या ठिकाणी उपस्थित राहून रस्ता रोखणाऱ्या शेतकऱ्याला समज देऊन संबंधित सर्व शेतकऱ्यांना रस्ता खुल्ला करून दिला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे, बालाजी मोमले, नामदेव राठोड, लक्ष्मण भांगे ,राजू जाधव ,शहाजी कुमदाळे ,उत्तम राठोड ,बाळासाहेब राठोड ,शिवाजी जाधव ,लक्ष्मण केंद्रे, वैजनाथ मुंडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
उपस्थित शेतकरी यांनी रस्ता खुल्ला करून दिल्याबद्दल उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे , तहसीलदार राम बोरगावकर व प्रशासनाचे अर्जदार शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.
इतरही कोणत्या गावात शेतीसाठी जाणारा रस्ता कोणीही अडवणार नाही, शेतकऱ्यांची गोची केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी समज तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली आहे.
