Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे झोपडपट्टीदादा, गुंड, हातभट्टीवाले, यांचे विरुद्ध लातूर पोलिसांची कडक कारवाई


 लातूर (एल. पी.उगीले) वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी तसेच लोकसभा निवडणूक-2024 व मतदान प्रक्रिया अनुषंगाने पोलीस ठाणे एमआयडीसी यांनी  महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गंत लातूर शहरातील सुभेदार रामजी नगर परिसरात राहणारा स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे, (वय 24 वर्ष) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

 एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई  करण्यात येत आहे. स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे याला 'एमपीडीए' कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली ही नववी कारवाई आहे.

  कुख्यात गुन्हेगार स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे, याच्या विरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे एकूण  13 गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये शस्त्रासह शरीराविरुद्ध, जबरीने मालमत्ता चोरी करण्याचे  गुन्हे, मालमत्ता चोरीचे गुन्हे ,भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे, असे एकूण 13 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.    

जनसामान्यात त्याची भीती होती. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी,(लातूर शहर) भागवत फुंदे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे नेतृत्वात एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोलीस अंमलदार विष्णू वायगावकर, गणेश मालवदे, भीमराव बेल्लाळे, अर्जुन राजपूत, युवराज गिरी,सिद्धेश्वर मदने, संतोष खांडेकर यांनी परिश्रम घेवून प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी यांचे कडे मंजूरी साठी पाठविला होता. व मंजुरी नंतर त्याची अंमलबजावणी केली आहे.

जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यावरून सदर आरोपीची 26 एप्रिल रोजी नाशिक येथील कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.


काय आहे एमपीडीए कायदा?


महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ,पायरसी) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृतींना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा सन 1981 (सुधारणा 1996, 2009 व 2015) अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सातत्याने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

              सतत गुन्हेगारी कृत्य करणारे गुंड प्रवृत्तीच्या विरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी)  सारख्या कठोर कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत असून यानंतरही लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी व भाईगिरी वृत्तीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता सदरची कार्यवाही करण्यात येणार असून लातूर पोलीस कडून जिल्ह्यातील धोकादायक गुंड व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या कुख्यात इसमांची माहिती संकलित करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.