देवर्जन :- प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी देवर्जन येथे महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू धर्मातील प्रचलित अनिष्ट रूढी परंपरा व जातीव्यवस्थेला नष्ट करून साडेतीनशे जातींना एकत्र करीत लिंगायत धर्माची स्थापना करणारे जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांनी जगाला लोकशाहीचा मार्ग दाखवला. अनुभव मंडपाच्या माध्यमातून जनहिताचे कार्य करण्याची प्रेरणा महात्मा बसवेश्वरांनी दिली. मानवता हाच खरा धर्म, याची शिकवण महात्मा बसवेश्वरांनी आठव्या शतकामध्ये समाजाला देऊन एक परिवर्तनवादी विकसनशील विज्ञानवादी संत म्हणून नावलौकिकास आले. त्यांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी देवर्जन येथे बसवेश्वर चौकामध्ये दरवर्षी महात्मा बसवण्याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याही वर्षी समाजातील जेष्ठ नागरिकांना घेऊन त्यांच्या हस्ते झेंडावंदन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.देवर्जनचे ज्येष्ठ नागरिक मन्मथआप्पा हैबतपुरे, भगवंतआप्पा दावणीपूर्गे यांच्या हस्ते झेंडावंदन करुन जयंती मोठ्या उत्साहात पार पाडली. यावेळी देवर्जन नगरीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
