उदगीर (एल.पी.उगीले) प्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन तथा केंद्र सरकारने देखील सिंगल युज प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंच्या वापरावर तसेच उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या बंदीच्या अनुषंगाने मध्यंतरीच्या काळात नगर परिषद प्रशासनाने धाडी टाकून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणली होती. मात्र सध्या उदगीर शहरासह तालुक्यात देखील प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या वस्तूंचा सर्रास वापर सुरू आहे. यामध्ये प्राधान्याने प्लास्टिक पिशव्या सोबत लग्न कार्यामध्ये भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्राळ्या, द्रोण, युज अँड थ्रो ग्लास यांचा वापर वाढला आहे. काम संपल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या असेल किंवा थर्माकोलच्या वस्तू असतील, रस्त्यावर फेकण्यात येतात. त्यामुळे नाल्यामध्ये त्या अडकून नाल्या तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच त्यापासून निर्माण होत असलेल्या कचऱ्याचे विघटन होत नसल्याने प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कित्येक वेळा प्लास्टिकच्या पिशव्यातून ओला कचरा फेकल्यामुळे किंवा पत्राळीवर अन्न शिल्लक राहिलेले असल्यामुळे, जनावरे ते खातात. आणि विविध रोगाला बळी पडतात. प्रदूषणा सोबतच जनावरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूवर बंदी घातली पाहिजे, मात्र सद्यस्थितीत नगरपालिका प्रशासनाला याचे फारसे भान नसावे. किंवा कर्मचारी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असावेत, अशी शक्यता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
उदगीर शहरामध्ये शासकीय निर्देशानुसार प्लास्टिक बंदीचे पालन करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाचे आहे. प्रदूषण मुक्त वातावरण निर्मितीसाठी सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या सरकारने प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यासाठी पुढाकार घेतला होता, परंतु म्हणावे त्या पद्धतीने त्याला यश आले नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल युज प्लास्टिक वापरावरील बंदीचे समर्थन करून नव्याने दिशा निर्देश जारी केले होते. परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या द्वारे त्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली की काय? अशी शंका येण्याइतपत सिंगल युज प्लास्टिक पिशव्या प्रत्येक दुकानात आणि भाजीपाल्याच्या ठेल्यावर दिसू लागल्या आहेत. प्लास्टिक बंदीच्या संदर्भात मध्यंतरीच्या काळात शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी झाली, मात्र त्याचा परिणाम कितपत होतो? हे पाहणे गरजेचे आहे.
लग्न समारंभाच्या वेळी विविध मंगल कार्यालयाच्या पाठीमागे किंवा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पत्रावळ्या टाकल्या जातात. यासंदर्भात प्रतिष्ठित लोकांना नोटिसा बजावून समज देणे गरजेचे असते, मात्र स्थानिक कर्मचारी पुढार्यांच्या, नेतेमंडळीच्या किंवा गर्भ श्रीमंत लोकांच्या विरोधात जाणे टाळतात. परिणामतः प्रदूषणाला वाव मिळतो. सद्यस्थितीत केवळ कागदी घोडे नाचऊन प्लास्टिक बंदीच्या घोषणा केल्या जातात, प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य आहे. कित्येक वेळा कचरा वाहतूक करणारे स्वतःच लोकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या कॅरीबॅग मध्ये द्या. अशी मागणी करतात, त्यामुळे नागरिकाकडून देखील सर्रासपणे प्लास्टिक कॅरीबॅग चा उपयोग केला जातो. कचरा संकलित झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट केली जात नाही. कित्येक वेळा शहराबाहेरील घोडदऱ्याजवळ कचरा जाळला जातो. त्यावेळी प्लास्टिक जळत असताना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी परिसरात पसरते, तसेच प्रदूषणाचाही भडीमार होत जातो. या सर्व गोष्टीची जाण ठेवून सिंगल युज प्लास्टिक आणि थर्माकोल प्लॅस्टिकचे ग्लास, प्लेट सर्रास विक्री होत आहे त्याच्यावर वेळीच बंधने आणणे गरजेचे आहे. सध्या विविध मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत, आणि जेवणावळीसाठी प्लास्टिक प्लेट, क्लास यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याचेही गांभीर्य प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. शहरातील नाल्यामध्ये ठीक ठिकाणी पिशव्यांचे ढीग दिसून येत आहेत. शहरातील अनेक भागात घंटागाड्या नियमितपणे येत नसल्याची ही ओरड नागरिकांतून होत आहे. त्यामुळे कॅरीबॅग मध्ये टाकलेला कचरा तसाच रस्त्यावर पडून राहत आहे. काही वेळेस तो कचरा नालीत पडल्यानंतर या प्लास्टिक कॅरीबॅगमुळे नाल्या तुंबू लागल्या आहेत. तसेच त्या कचऱ्याचा वापर अन्न म्हणून करणाऱ्या जनावरांना देखील रोग पसरू लागले आहेत. या सर्व गोष्टी कडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. अशी मागणी केली जात आहे. सद्यस्थितीत नगरपालिकेवर प्रशासन राज असल्याने उदगीरचे उपविभागीय अधिकारी योग्य काळजी घेतील अशी अपेक्षाही जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.
