उदगीर (एल पी उगिले)
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लोकसभेच्या प्रचाराच्या सभेसाठी केलेल्या भाषणामध्ये, पिछले दरवाजे से ओबीसी आरक्षण लुटा जा रहा है! असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य मराठा आंदोलनाशी संबंधित असल्यामुळे अत्यंत न्याय पद्धतीने आणि संविधानाचे अधिकार वापरून मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. ते आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने मागणी करत आहेत, तरीदेखील देशाच्या उच्चपदस्थ व्यक्तीने अशा पद्धतीने निषेधार्थ वक्तव्य करून मराठा समाजाची मानसिकता बिघडवून टाकली आहे. तसेच भावना दुखावल्या आहेत.
कोणी आपल्या हक्कासाठी राज्यघटनेचा आधार घेऊन लढा उभारत असेल तर त्या समाजाला लुटारू म्हणणे म्हणजे अप्रत्यक्षपणे राज्यघटनेचा अपमान आहे. या गोष्टीची जाणीव सर्व मराठा कार्यकर्त्यांना आहे. आंदोलनकर्त्याच्या भावनेशी खेळत, भविष्यात आरक्षण द्यायचं नाही.असा संदेशही अप्रत्यक्षपणे दिला आहे. मराठ्यांना लुटेरा म्हणणाऱ्यांचा मराठा आरक्षण समन्वय समिती आणि सकाळ मराठा समाज युवा वर्गाकडून निषेध व्यक्त करून राज्यघटनेचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांचा निषेध करत असल्याचे पत्र राष्ट्रपतींना पाठवण्यात येत असून, राष्ट्रपतींनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. अशी मागणी भाकसखेडा येथील चेअरमन विवेक पंडित जाधव यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील बहुसंख्य विभागामध्ये मराठा समाज कुणबी आहे. असे सिद्धही झाले आहे, काही भागांमध्ये हे सिद्ध होणे बाकी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा फायदा व्हावा या उद्देशाने, मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तसेच मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी 1986 सालापासून सुरू आहे. यासाठी मराठा समाजाने लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये 53 मोर्चे काढले. अत्यंत शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले गेले. आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले जावे म्हणून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, तरी देखील शासन म्हणाव्या त्या गांभीर्याने पाहत नाही, हे दुर्दैव आहे. असे विचार सकल मराठा समाजाचे युवा नेते तथा चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी भाकसखेडा विवेक पंडित जाधव त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
अत्यंत शांततेने, लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या संघर्षाला, आंदोलनाला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मागच्या दाराने ओबीसी आरक्षण लुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे विधान करत आहेत. एका अर्थाने त्यांचे हे विधान म्हणजे संपूर्ण समाजालाच लुटेरा म्हणणे असे आहे. हे अशोभनीय आणि निंदनीय आहे. त्यामुळे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आपले अस्तित्व दाखवत मोदी यांच्या या विधानाचा निषेध नोंदवावा. असे ही आवाहन विवेक जाधव यांनी केले आहे.
