उदगीर (एल. पी. उगिले) मराठवाड्यातील गरजवंत मराठ्यांसाठी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर घेऊन, मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. सकल मराठा समाजाला न्याय द्यावा. या उद्देशाने त्यांनी आंदोलन चालू केले आहे. मात्र त्या आंदोलनाला वाटाण्याच्या अक्षता लावून, न्याय प्रक्रियेत टिकणार नाही. अशा पद्धतीचे दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची बोळवण करण्यात आली आहे.
कहर म्हणजे बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबाजोगाई येथे आले असता, त्यांनी स्पष्टपणे काही लोक मागच्या दारातून ओबीसीचे आरक्षण लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. असे वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या गोष्टीचे गांभीर्य वेळीच मराठा समाजाने घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या मतदानाच्या जोरावर आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. 100% मतदान कसे होईल यासाठी मराठा समाजातील तरुणांनी पुढाकार घ्यावा, आणि मराठा समाजाची अवहेलना करणाऱ्यांना धडा शिकवावा. असे वक्तव्य राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी केले आहे.
बीड, जालना आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मतदान होणे बाकी आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी पंतप्रधान आले असता त्यांनी स्पष्टपणे जेव्हा ओबीसी आरक्षण मागच्या दारातून लुटण्याचा प्रयत्न होत आहे, असा उल्लेख केला. त्याचाच अर्थ त्यांना मराठा समाजाला न्यायालयीन प्रक्रियेत टिकेल असे आरक्षण द्यायचे नाही, ही प्रवृत्ती त्यांनी बोलून दाखवली आहे. तेव्हा खोटे आणि फसवे आश्वासन याला बळी न पडता त्यांना योग्य धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतीय राज्यघटनेचा आदर ठेवून सर्व मराठा समाजातील तरुणांनी आणि जाणकारांनी मतदान प्रक्रियेतून आपली शक्ती दाखवणे गरजेचे आहे. आणि त्या दृष्टीने कार्य व्हावे. अशीही अपेक्षा निवृत्ती सांगवे यांनी व्यक्त केली आहे.
