उदगीर (एल.पी.उगीले)
तंत्रज्ञानामुळे संपूर्ण ज्ञान मराठीत आले आहे. हे खर आहे; पण वाचन व चिंतन यासाठी आपण किती वेळ काढतो, हे देखील प्रत्येकाने स्वतः तपासायला हवं. ज्ञानाचे केवळ संकलन करून चालणार नाही, तर आत्मसात करून प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे आहे, असे विचार अनंत कदम यांनी व्यक्त केले.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून चला कवितेच्या बनात व वाचक संवादाचे संयोजक अनंत कदम उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.म.ई.तंगावार यांनी करून दिला.
‘वाचक संवाद : पुस्तकांशी जुळवू नाते’ या विषयावर बोलताना अनंत कदम म्हणाले, लहान मुलं देखील निरीक्षण करतात. ते देखील एक प्रकारचे वाचनच असते. वाचन हा एक संस्काराचा भाग आहे. वाचनसंस्कृतीच्या बाबतीत आज फारशी समाधानकारक परिस्थिती नाही, तरी प्रत्येकाने स्वतःपासून ही संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असे सांगत त्यांनी वाचक संवादाच्या जडणघडणीवर विस्ताराने प्रकाश टाकले. तसेच माध्यमाविषयी कृतज्ञताही व्यक्त केली.अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, वाचक संवादामुळे अनेक कलाकृती श्रोत्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. खरं पाहिलं तर आपल्या मनाचा, भावनांचा विकास ग्रंथातून होत असतो. पुस्तक प्रत्येक माणसाला जगणं शिकवित असतात.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रासेयोचे माजी संचालक डॉ.शिवराज बोकडे, विद्यापीठातील माहितीशास्त्रज्ञ डॉ.रणजीत धर्मापुरीकर, हैदराबाद येथील मराठीचे प्राध्यापक डॉ.अरुण कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ.मंदाकिनी राठोड, माजी ग्रंथपाल प्रा.बाबुराव माशाळकर व विविध परिसरातून प्राध्यापक, वाचक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जे.डी. संपाळे तर आभार ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ यांनी मानले.
