उदगीर ( एल.पी.उगीले) जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात ' विषय ज्ञान समृद्धीसाठी अवांतर वाचनाचे महत्त्व' या विषयावर उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी सर्व शिक्षकांशी संवाद साधला. पुस्तक दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड तसेच प्रमुख वक्ते म्हणून संजय कुलकर्णी यांनी विषय मांडणी केली. यावेळी पर्यवेक्षक कृष्णा मारावार, श्रीपत सन्मुखे व माधव मठवाले उपस्थित होते.
केवळ अभ्यासक्रम शिकविणे व पाठ्यपुस्तक संपविणे असे शिक्षणाचे उद्दिष्टे कधीही नव्हते. विद्यार्थी संवेदनशील, डोळस, ज्ञानी , दुरदृष्टी व राष्ट्रप्रेमी बनावा. यासाठी शिक्षकांनी अध्यापनात प्रयोगशीलता आणली पाहिजे.यासाठी आपल्या विषयाच्या अनुषंगाने शिक्षकांनी वाचनाचा व्यासंग जोपासावा. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या भात्यातील अक्षय बाण संपत नव्हते, त्याप्रमाणेच अध्यापनात शिक्षकांकडील शब्दधन हेच त्यांचे शस्त्र अस्त्र आहे. 'सध्या आपण कोणते पुस्तक वाचत आहात ?"असा प्रश्न शिक्षकांनी एकमेकांना विचारायला हवा. संवाद कौशल्य ,विचार कौशल्य व ज्ञान समृद्धीसाठी आपल्या उत्पन्नापैकी काही भाग ग्रंथ खरेदीवर अवश्य खर्च करावा,असेही आवाहन यावेळी उपमुख्याध्यापक संजयराव कुलकर्णी यांनी केले.
मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड यांनी सर्व शिक्षकांना पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रंथ पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून अनिता यलमटे यांनी ग्रंथ चळवळीची गरज शिक्षकी पेशात नितांत आवश्यक असल्याचे नमूद केले. शिक्षक वाचक असतील तर विद्यार्थी आपोआपच ग्रंथालयाकडे वळतील .वर्ग ग्रंथालयासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ग्रंथ खरेदीची व वाचनाची आवड शिक्षकांनी निर्माण करावी, असे मत मांडले .
सूत्रसंचालन प्रसिद्धी विभाग प्रमुख अनिता यलमटे यांनी केले, तर परीक्षा प्रमुख व पर्यवेक्षक श्रीपत संमुखे यांनी ऋणनिर्देश केले.
