उदगीर (एल.पी. उगिले)
उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये भुरट्या चोऱ्या आणि घरफोड्यात वाढ झाली आहे. उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निडेबन परिसरातील वीर सावरकर नगर मध्ये घरफोडी करून चोरट्यांनी दहा हजार 970 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, ऋषभ नरसिंग ऊळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी रवी सुभाष धोत्रे (रा.साईनगर, भालकी जिल्हा बिदर, कर्नाटक) यांनी शुक्रवारी निडेबन हद्दीतील वीर सावरकर नगर कॉलनी मध्ये सकाळी 11 ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान ऋषभ नरसिंग ऊळे यांच्या घराच्या दाराला कडी कोयंडा लावल्याचे पाहून, कडी आणि कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घराच्या कपाटाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने, एक निकाॅन कंपनीचा कॅमेरा आणि काही रोख रक्कम असे एकूण दहा हजार 970 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार उदगीर ग्रामीण पोलिसात दिली आहे. यावरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गु. र. नंबर 217/ 24 कलम 454, 380 भारतीय दंड विधान संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाढत्या चोऱ्या आणि घरफोड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामीण पोलिसांकडून गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.
