उदगीर : येथील उदगीर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील सेवा निवृत्त सहशिक्षक कालवंश हरिनाथ किशनराव सुतार यांचे रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने उदगीर शहरासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
कालवंश सुतार यांनी तब्बल ३५ वर्षे शिक्षक म्हणून कार्य करत असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. शिक्षणाबरोबरच त्यांनी गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी आर्थिक व शैक्षणिक मदत करून समाजात एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने त्यांना ‘आदर्श शिक्षक’ म्हणून गौरविण्यात आले होते.
त्यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवून समाजोपयोगी कार्य केले. त्यांच्या मनमिळाऊ व सहृदय स्वभावामुळे ते सर्वांच्या सुख-दुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात पत्नी कमलबाई सुतार, तीन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सुतार कुटुंबियांसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील ज्येष्ठ मंडळी तसेच बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी सुतार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कार्याची आठवण उपस्थितांच्या मनात कायम राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
