उदगीर प्रतिनिधी
उदगीर येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल : म्युच्युअल फंड आणि एस.आय.पी.” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी श्री. सचिन कोरे, शाखाधिकारी, एच.डी.एफ.सी. बँक, उदगीर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मदन शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या व्याख्यानात श्री. सचिन कोरे यांनी म्युच्युअल फंडाची संकल्पना, त्याचे प्रकार, गुंतवणुकीतील जोखीम व परतावा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच एस.आय.पी. (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून नियमित व शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य कसे साधता येते, यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कमी वयात बचत आणि गुंतवणुकीची सवय लावून घेणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी सोप्या उदाहरणांतून स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या व्यावहारिक ज्ञान देणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.मदन शेळके यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली.व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. सचिन कोरे यांनी समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.संजीवकुमार माने यांनी केले तर डॉ. जाधव बी.बी.यांनी आभार मानले.कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
