उदगीर (एल. पी .उगीले):- छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय आयुक्त यांनी मराठवाड्यात सस्ती अदालतीचा कार्यक्रम हाती घेऊन अनेक शेतकऱ्याचे रस्त्याचे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी ही मोहीम नाविन्यपूर्ण पद्धतीने मराठवाड्यात राबविलेली आहे. या मोहिमेमुळे लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन अति तात्काळ पद्धतीने शेतकऱ्यासाठी रस्तेखुल्ले करावे, असे सांगितले. यावरून उदगीर उपविभागातील उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सस्ती अदालतीचे आयोजन करून तालुक्यातील शेत रस्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी यांना आवाहन केले. त्यानुसार जळकोट तालुक्यातील अनेक शेत रस्त्याचे प्रश्न सोडविण्याची धडक मोहीम चालू केली. त्या अनुषंगाने जळकोट तालुक्यात अनेक अतिक्रमित रस्ते अतिक्रमण मुक्त होत आहेत. त्याच अनुषंगाने गेल्या चार वर्षापासून कोळनूर ते कोणाळी डोंगर या रस्त्यासाठी अर्जदार संग्राम उळागड्डे व गंगाधर मुळे हे प्रयत्न करत होते, परंतु चार वर्षापासून त्यांना रस्ता मिळत नव्हता. सस्ती आदालत च्या धडक मोहीम मध्ये अर्जदार यांनी पुन्हा तहसीलदार राजेश लांडगे यांच्याकडे अर्ज सादर केला. त्या अर्जाची तात्काळ दखल घेऊन सदर अर्ज तहसीलदार यांनी घोणशी विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव यांना जायमोक्यावर चौकशीसाठी दिला. त्या ठिकाणी जाऊन मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी तहसीलदार यांना अहवाल सादर केला. त्या अनुषंगाने वादी व प्रतिवादी यांना समक्ष हजर राहण्यास सूचना देऊन सुनावणी घेतली व जळकोटचे तत्पर तहसीलदार राजेश लांडगे यांनी हा रस्ता खुला करण्यासाठी आदेश पारित केला. त्या अनुषंगाने या आदेशाची अंमलबजावणी करिता जळकोटचे नायब तहसीलदार संतोष गुटे, मंडळ अधिकारी पंडित जाधव यांना आदेश देऊन आदेशाप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांना रस्ता खुल्ला करून द्यावा, असे पत्र दिले. त्या अनुषंगाने कोळनुर ते डोंगर कोणाळी रस्ता खुला करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी उदगीर व तहसीलदार जळकोट यांचे आभार शेतकरी व्यक्त करीत आहेत
या निमित्ताने बोलत असताना शेतकऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे पाण्याची सोय आहे, परंतु रस्ता नव्हता. त्यामुळे आम्ही बागायत जमीन करू शकत नव्हतो, आता रस्ता झाल्यामुळे आमची संपूर्ण जमीन बागायत होईल. व त्यामुळे आम्हाला आर्थिक फायदा होईल. आमच्या जीवनात एक उन्नती होईल. त्यामुळे आम्ही शेतकरी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत असे शेतकरी गंगाधर मुळे यांनी सांगितले.
हा रस्ता खुल्ला करण्यासाठी नायब तहसीलदार संतोष गुटे, मंडळ अधिकारी पंडित जाधव, ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण आटकळे, ग्राम महसूल अधिकारी परशुराम जानतेने ,माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन चोले, धोंडीराम चोले, तुळशीदास चोले, अक्षय चोले ,संग्राम उळागड्डे, लक्ष्मण चोले, रमेश चव्हाण, भगवान नरवटे, गंगाधर मुळे, हर्षद उळागड्डे, गोविंद उळागड्डे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
