उदगीर (प्रतिनिधी) /कारगिल विजय दिनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील राष्ट्रीय छात्र सेना व लातूर येथील एनसीसी बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या आईची सदिच्छा भेट घेण्यात आली. तसेच उदगीर येथील शहीद कृष्णकांत कुलकर्णी चौकामध्ये त्यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून कृतज्ञतेचे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सैनिक उपस्थित होते. यावेळी एनसीसी कंपनी कमांडर कॅप्टन डॉ. राम साबदे, एनसीसी बटालियन लातूरचे नायब सुभेदार बाजीराव पाटील तसेच पीआय स्टाफ यांनी देखील सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचे व शौर्याचे महत्व पटवून देण्यात आले. शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
