उदगीर (ॲड. एल.पी.उगीले) लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी अवैध धंद्याच्या विरुद्ध कठोर भूमिका घेतल्यामुळे एकूण सर्वच पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी अलर्ट मोडवर आले आहेत.
उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड यांनी ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करून, धाडी टाकायला सुरुवात केली आहे. प्राधान्याने अवैध देशी दारू विक्री तसेच बनावट व विषारी हातभट्टीची दारू विक्री याला आळा घालण्यासाठी असे धंदे करणाऱ्या वर खटले दाखल करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला जात आहे.
उदगीर शहरातील संजय नगर वडार गल्ली भागामध्ये लक्ष्मीबाई वैजनाथ पल्ले (वय 45 वर्ष) या महिलेने मोठी अक्कल हुशारी दाखवत नायलॉनच्या तांदळाच्या पोत्यात पाण्याच्या बाटल्या मध्ये हातभट्टीची गावठी दारू भरून प्रति बॉटल शंभर रुपये प्रमाणे विक्री करत असल्याची माहिती हाती लागतात, बातमीची शहानिशा करून शहर पोलिसांनी धाड टाकली. त्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री होत असताना अशा एकूण 17 बॉटल अंदाजे किंमत सतराशे रुपये, तसेच एका खाकी रंगाच्या खपटी बॉक्समध्ये देशी दारू भिंगरी संत्राच्या 48 बॉटल प्रत्येकी किंमत 70 रुपये प्रमाणे एकूण 3360 रुपये किमतीचा मुद्देमाल, असा एकूण 5060 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या जवळ बाळगलेली मिळून आली, म्हणून तिच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे 250 /25 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून सदरील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक कांबळे हे करत आहेत. अशाच पद्धतीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारावर खटले दाखल करण्याची मोहीम राबवली जात असून अवैध आणि विषारी दारू विक्रीला पूर्णपणे आळा घातला जाईल, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.