Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, पंचनाम्याचे नाटक टाळून मदत करा - सौ उषा कांबळे










उदगीर (प्रतिनिधी) 

उदगीर विधानसभा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आता शासनाकडून पाहणी आणि पंचनामाचे नाटक सुरू होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्याला पिक विमा मिळालेला नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. हाती आलेली पीक जाते की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना शासनाने या बाबीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे आढावा घेऊन पंचनामाच्या सूचना केल्या आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे उंटावरून शेळ्या राखण्यासारखा आहे. काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते, स्थानिक पुढारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करू लागले आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना या गोष्टीचे भान राहिलेले नाही.

 त्यामुळे हे पाहणी आणि पंचनामाचे नाटक सोडून सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे यांनी केली आहे. 

शासनाला पाठवलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, गेल्या दोन-तीन दिवस या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, आणि शेतकऱ्यांना यापूर्वीही विमा मिळालेला नाही. कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत पंचनाम्याचे नाटक योग्य होणार नाही, कारण सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 एकही शेतकरी त्याला अपवाद नाही. इतकेच नाही तर अनेक घरांचीही पडझड झालेली आहे, जनावरे दगावली आहेत, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी पाऊस होण्याची शक्यता असल्याने इतर कोणत्याही आर्थिक किंवा जीवितहानीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने देखील प्रशासनाने सतर्क राहून लोकांना मदत करावी. कारण दोन दिवसांपूर्वी तर अनेक महसूल मंडळअंतर्गत अतिवृष्टी झालेली आहे. नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. या सर्व बाबींची तातडीने दखल घेऊन नागरिकांना सहकार्य करावे. अशीही मागणी सौ.उषा कांबळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.