शाहूवाडी (प्रतिनिधी) : 'कृतीसाठी आवाहन' या संकल्पनेवर आधारित यंदाच्या १४ व्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री व्याघ्र राखीवच्या पुढाकारातून विविध उपक्रमांचे आयोजन करून आज (ता. २९) रोजी मलकापूर नगरीत व्याघ्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मलकापूर हायस्कूल व श्रीमान ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून नामशेष होत चाललेल्या वाघ आणि अन्य वन्य जीवांबद्दल लोकजागृती करण्यात आली.
सह्याद्री व्याघ्र राखीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि नगरवासीयांना निसर्गचक्रात असलेले जंगल व वन्यजीवांचे महत्व पटवून दिले. तसेच श्री. शिंदे यांनी वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष याबाबत महत्वपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले. याशिवाय शेती-शिवारात वाघ, बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांपासून जंगल सीमेवरील स्थानिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत कशी काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात या अनुषंगाने देखील चित्रफित व प्रात्यक्षिकांच्या आधारे उपस्थितांच्या शंका, समस्यांचे निरसन केले. प्राचार्य एस. व्ही. कुंभार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाप्पा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वन्य जीवांचे महत्त्व कळावे, वन्य प्राण्यांविषयी त्यांच्या मनात भूतदया निर्माण व्हावी, वनसंपत्तीविषयी मानवाला आपुलकी वाटावी, वन्यजीवांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सांगून वाघोबा हे क्रुरतेचे नव्हे तर राजबिंडेपणाचे, शौर्याचे प्रतीक आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. वाघ हा अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असून भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक अत्यावश्यक भाग असल्याचे प्रतिपादन करुन वाघाच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याची, वाघ वाचवण्याची गरज प्रा. शिवाप्पा पाटील यांनी प्रास्ताविकातून विशद केली. यावेळी व्यासपीठावर वनपाल सुरेश चरापले (उदगिरी), आंबा वन विभागाचे एस. एस. पोवार, प्रा. ए. व्ही. पवार, प्रा. व्ही. व्ही. कोकरे, गोविंद पवार (निवळे), संजय फड (शेडगेवाडी), मनीषा देसाई, रोहिदास पडवळे, अरविंद पाटील, अंजली नवले, भाग्यश्री बांगर, कोमल मराठे, विशाल पाटील (ऊखळू) यांच्यासह अन्य वनरक्षक उपस्थित होते.
दरम्यान रुबाबदार चाल, मिशांचा मिजास आणि डरकाळी फोडत 'मला वाचवा, निसर्ग वाचवा' ही आर्त हाक देत सभागृहात आलेला वाणिज्य शाखेतील इयत्ता अकरावी (ब) तुकडीचा वाघोबाच्या पोशाखातील विद्यार्थी पार्थ शामराव जाधव कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू ठरला. यानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात ऋतिका संदीप पाटील, वैष्णवी कृष्णा लोकरे, श्रावणी अजित भोगटे यांनी अचूक उत्तरे सादर करून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. त्याबद्दल त्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. एम. पोवार यांनी केले. प्रा. एम. पी. चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विकास कोकरे, प्रा. पूर्वा खोत, प्रा. पी. व्ही. कदम, प्रा. एस. वाय. इंदापूरे, डी. बी. कोडोलकर, एन. एस. कदम, एन. के. कोठावदे यांनी परिश्रम घेतले.
